सांगली : घातक शस्ञांचा ऑनलाईन बाजार! | पुढारी

सांगली : घातक शस्ञांचा ऑनलाईन बाजार!

सांगली; संजय खंबाळे :

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘होम डेकोरेशन’च्या नावाखाली घातक शस्ञांची ऑनलाईन विक्री सुरू आहे. काही कुरिअर कंपन्यांमार्फत बेधडक शस्ञे वितरित केली जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व यंत्रणा मोडीत काढण्याची आवश्यकता आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुरियर कंपनीकडून मागविण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोठा शस्ञसाठा जप्त करण्यात आला. औरंगाबादमध्ये तर दुसर्‍यांदा अशी घटना उघडकीस आली. सांगली जिल्ह्यातही काही दिवसांपासून ‘होम डेकोरेशन’च्या नावाखाली हा धंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे.

जिल्ह्यात अनेक कुरिअर कंपन्या लोकांना चांगली सुविधा देत आहेत. मात्र, काही कंपन्यानी सोशल मीडियातून चाकू, गुप्ती, तलवार अशा घातक शस्ञांचा बाजार मांडला आहे. यासाठी सोशल मीडियावर विविध ग्रुपची स्थापना केली आहे. धारदार शस्ञांची भुरळ घालून तरुणांना आकर्षित केले जात आहे. मोबाईलवर सुरूवातीला ऑनलाईन शस्ञांची चित्रे दाखविली जातात. त्यानंतर पसंत असलेल्या वस्तूंची किंमत सांगण्यात येते. काही कंपन्यांना अ‍ॅडव्हान्समध्ये तर बहुसंख्यजणांनी वस्तू पोहोच झाल्यानंतर पैसे देण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. बुकिंग केल्यानंतर सात ते आठ दिवसांत ‘होम डेकोरेशन’ या नावाखाली ही शस्ञे घरपोच केली जातात. यातून गुन्हेगारी जगताला घातक शस्ञे सहज उपलब्ध होत आहेत. भविष्यात ही शस्ञे अवघ्या समाजाला घातक ठरण्याची भीती आहे. दिवसाढवळ्या शस्ञांचा बाजार सुरू आहे. पण कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

याला वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घातक शस्ञे उपलब्ध होतातच कशी, याच्या मुळाशी जाऊन असा शस्ञ पुरवठा करणारी यंत्रणाच मोडीत काढण्याची गरज आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

पोलखोल करण्याची आवश्यकता!

जिल्ह्यात होणार्‍या विविध समारंभात तलवारीचे प्रदर्शन करण्यात येत आहे. नेते मंडळींना तलवार भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे. समारंभात, केक कापण्यासाठी, भेट देण्यासाठी होणारा तलवारीचा वापर हा गुन्हा होत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी अशा समारंभात वापरण्यात येणार्‍या शस्ञाची माहिती घेतल्यास यातून शस्ञविक्रीची पोलखोल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील संशयास्पद वाहनांची झाडाझडती घेतल्यासही शस्ञसाठा हाती लागू शकतो.

कायदा काय म्हणतो!

कायद्यानुसार परवानगीशिवाय, सबळ किंवा पारंपरिक कारणाशिवाय सहा इंचापेक्षा जादा लांबीचे घातक शस्ञ सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. मात्र, त्यापेक्षा कमी लांबीचे शस्ञ वापरता येते, असा त्याचा अर्थ नाही. त्यापेक्षा कमी लांबीच्या धारदार वस्तूचा कुणी शस्ञ म्हणून वापर करीत असेल किंवा करणार अशी शंका असेल, तर तोदेखील गुन्हा आहे. स्वयंपाक घरातील चाकू-सुरा यात मोडत नाही. परंतु त्यांचाही हाणामारीत वापर झाला तर त्याला शस्ञच समजण्यात येते.

Back to top button