नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकच्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न हे माझे स्वप्न आहे,असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानापूर्वी कर्नाटकवासियांना भाजपला मतदान करण्याची साद घातली. राज्यातील जनतेसाठी मोदींनी एक खुल पत्र लिहले आहे. शिवाय भाजपने पंतप्रधानांचा एक व्हिडिओ जारी केला असून यात ते मतदारांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यातील २२४ विधानसभा मतदार संघात एकाच टप्प्यात बुधवारी मतदान पार पडले.राज्यात यंदा ५.२ कोटी वैध मतदार असून यातील ९.१७ लाख पहिल्यांदा मताधिकाराचा वापर करणारे आहेत.
"आपण सर्वांनी मला सदैव प्रेम आणि आपुलकी दिली. हे माझ्यासाठी देवाच्या आशीर्वादारुपी आहे.स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आम्हा भारतीयांचे लक्ष देशाला विकसित देश बनवण्याचे आहे.या स्वप्नपुर्तीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे नेतृत्व करण्यासाठी कर्नाटक उत्सुक आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.आम्हचे पुढचे लक्ष पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत येण्याचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कर्नाटक वेगाने प्रगती करेल आणि आपण १० ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनू" अशी भावना पंतप्रधानांनी पत्रातून व्यक्त केली.
पत्रातून पंतप्रधानांनी कर्नाटक तसेच कर्नाटकवासियांप्रती भाजपची कटिबद्धता अधोरेखित केली. कोरोना महारोगराईत भाजप शासन काळात कर्नाटकात दरवर्षी ९० हजार कोटींहून अधिकची विदेशी गुंतवणूक आली. गेल्या सरकारच्या काळात ही रक्कम केवळ ३० हजार कोटी होती.राज्याला गुंतवणूक, उद्योग आणि नवीनतेमध्ये अग्रस्थानी घेवून जाण्यासह शिक्षण, रोजगार तसेच उद्योजकतेत क्रमांक एकवर घेवून जायचे आहे' असे पंतप्रधान म्हणाले.
ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधा, परिवहन तसेच रोजगार संबंधी चिंता प्रकट करतांना पंतप्रधान म्हणाले, भाजप सरकार राज्यात अत्याधुनिक शहरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कार्यरत राहील. परिवहनाचे आधुनिकीकरण केले जाईल, ग्रामीण व शहरी भागात जीवनमान उंचावण्यासाठी तसेच महिला तसेच युवकांसाठी संधी निर्माण केल्या जातील, असे आश्वासन यानिमित्ताने पंतप्रधानांनी कर्नाटकवासियांना दिले. या पत्रासह भाजपने जारी केलेल्या व्हिडिओ संदेशातून पंतप्रधानांनी कर्नाटकच्या जनतेला राज्याला अव्वल करण्यासाठी अवश्य मतदार करण्याचा आग्रह केला. कर्नाटकचा वारसा, सांस्कृतिक सामर्थ वंदनीय असल्याचे सांगत भगवान बसेश्वर, नाड प्रमु कनकदासा यांचा देखील उल्लेख पंतप्रधानांनी केला.
हेही वाचा