मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा : देशातील सहकारी संस्थांची स्थिती चिंताजनक आहे. परंतु, के. पी. पाटील यांनी बाजार समिती कोल्हापूर, हुतात्मा स्वामी सूत गिरणी, बिद्री सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवला आहे. सहकार क्षेत्रातील त्यांची पकड चांगली आहे. गेली दोन वेळा राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत के.पी. पाटील का पराभूत झाले, याची कारणे आपल्याला माहीत आहेत. त्यामध्ये दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
ते आदमापूर (ता. भुदरगड) येथील राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी गेले अनेक वर्षे सांभाळली आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीची ध्येयधोरणे सर्वश्रुत आहेत. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी के. पी. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने विकास कामांसाठी निधी वाटप योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे. पक्ष बलवान करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने उभा राहिला आहे.
विश्वनाथ कुंभार यांनी स्वागत केले. किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. पंडीतराव केणे, धोंडीराम वारके, राजेंद्र पाटील, मधुकर देसाई, धनाजीराव देसाई, उमेश भोईटे, अशोक कांबळे, युवराज वारके, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, अनिल साळुंखे, बाळ देसाई, विनय पाटील, संतोष मेंगाणे, धैर्यशील पाटील (कौलवकर), विकास पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय पाटील, संग्राम देसाई, बापुसो आरडे, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब , राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई आदी उपस्थित होते. आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी आभार मानले.
हेही वाचलंत का ?