‘मातोश्री’वर येवून दाखवाच, किशोरी पेडणेकर यांचे खुले आव्हान | पुढारी

‘मातोश्री’वर येवून दाखवाच, किशोरी पेडणेकर यांचे खुले आव्हान

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आमच्या पवित्र ‘मातोश्री’वर येवून हनुमान चालिसा वाचून दाखवावीच, असे खुले आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याला दिले. मातोश्री ही बाळासाहेबाच्या पवित्र पदपस्‍पर्शाने पावन झाली आहे. आणि येथे कोण येत असेल तर शिवसैनिक त्‍यांचा हिसका दाखवतीलच. आमच्या पवित्र मातोश्रीवर जर कोणी येत असेल तर शिवसैनिक साहेबाच्या आदेशाची वाट पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असणा-या ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिस पठण करण्यावर आम्ही ठाम असून, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे मुंबएतील राजकारण ढवळून निघत असल्याचे चित्र आहे. उद्या नेमके काय घडणार याकडे जनतेचे लक्ष्य लागून राहिले आहे.

किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्‍हणाल्‍या, आमच्या पवित्र मातोश्रीवर येवून हनुमान चालिसा वाचून दाखवावी, असे खुले आव्हान त्‍यांनी केले आहे. तर आमचे पक्ष प्रमुख कधीच चूकीच्या गोष्‍टींचे सर्मथन करत नाहीत. आणि त्‍यांचा अशा गोष्‍टींना विरोधच आहे. तसेच मातोश्रीच्या झालेल्‍या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्‍या शिवसैनिकाना सांगितले आहे, आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपण आपले कामे करत रहायचे, असे त्यांनी सांगितले.

हनुमान चालिसाच का वाचणार आहेत? असा सवाल त्‍यांनी यावेळी उपस्‍थित केला. तर हनुमान स्‍त्रोत्र का नाही वाचणार. ते त्‍यांना का चालत नाही? असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा  

Back to top button