नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांना बुधवारी (दि.१७) सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आसाम काँग्रेसमधून निलंबित महिला सदस्याचा अपमान केल्याप्रकरणात न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला. तपासादरम्यान अधिकाऱ्यासमक्ष हजर राहण्याचे तसेच तपासात सहकार्य करण्याच्या अटींवर न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे.
अंतरिम जामीन याचिका फेटाळणाऱ्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात श्रीनिवास यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेत, आसाम सरकार तसेच इतरांना नोटीस बजावत १० जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गुन्हा दाखल करण्यात एक महिन्यांचा विलंब झाल्याचे लक्षात घेता, याचिकाकर्त्याला अंतरिम जामीन मिळाला पाहिजे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. न्यायालयाने श्रीनिवास यांना २२ मे रोजी पोलिसांसमक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ५ मे रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाने श्रीनिवास यांना आसाम युवक काँग्रेसमधून निष्कासित प्रमुख अंगकिता दत्ता यांनी दाखल केलेल्या एका प्रकरणात अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. दत्ता यांनी श्रीनिवास यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. दत्ता यांनी १८ एप्रिल रोजी अनेक ट्विट करीत आयवायसी अध्यक्षांवर आरोप लावले होते.