पुढारी ऑनलाईन : देशाच्या संविधानावर वारंवार हल्ले होत आहेत. देशातील लोकांचे हक्क मारले जात आहेत. देशाची लोकशाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत संविधान वाचवण्यासाठी देशात दुसरा स्वातंत्र्य लढा उभा करावा लागत आहे हे दुर्दैवी असल्याचे मत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीवर बोलताना राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात प्राथमिक चर्चा झाली आहे. यासंदर्भातील चर्चा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झाली आहे. आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण व्हावे हीच प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
संविधान वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन, संविधान वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. भूमिपुत्रांनी रोजगार मिळावा यासाठी हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.