डॉ. ग. गो. जाधव अध्यासन देशातील पत्रकारितेची सर्वोच्च संस्था व्हावी : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

डॉ. ग. गो. जाधव अध्यासन देशातील पत्रकारितेची सर्वोच्च संस्था व्हावी : डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासन हे देशातील पत्रकारितेचे पहिले अध्यासन आहे. अध्यासनांतर्गत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत कोर्स सुरू करून देशातील पत्रकारितेची सर्वोच्च संस्था बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केली.

विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी डॉ. जाधव यांनी अध्यासन इमारत बांधकामाची पाहणी करून काही सूचना केल्या. याप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जाधव म्हणाले, अध्यासन इमारतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्यास लँडस्केपिंगसह इतर गोष्टी करणे सोपे होईल. मास कम्युनिकेशनचे वर्ग अध्यासनाच्या इमारतीमध्ये सुरू केल्यास वर्दळ वाढून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत. दोन महिन्यांत इमारतीचे सर्व बांधकाम पूर्ण करावे, अशी सूचना डॉ. जाधव यांनी केली.

सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी नवीन अभ्यासक्रमाबाबत काही सूचना केल्या. सध्या सोशल मीडिया व चॅट- जीटीपीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. त्या अनुषंगाने इंडस्ट्रीची गरज ओळखून नवीन कोर्सेस ठरावावेत. अध्यासनातर्फे तीन कोर्सेस सुरू आहेत. भविष्य काळाचा विचार करून आणखी अद्ययावत नवीन कोर्सेसची निर्मिती करावी. हे कोर्सेस जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

विनायक पाचलग यांच्यासह तज्ज्ञ मंडळी घेऊन कमिटी करावी, अशी सूचना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केली. तसेच अध्यासनामध्ये अद्ययावत डिजिटल स्टुडिओ तयार करावा, असे कुलगुरू म्हणाले.

आर्किटेक्ट शीतल पाटील म्हणाल्या, अध्यासन इमारतचा स्लॅब १५ दिवसांत पूर्ण झाल्यावर लँड स्केपिंगच्या कामास सुरुवात करता येईल. यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनिता पाटील, बांधकाम ठेकेदार सुनील नागराळे, अभियंता डॉ. गिरीश कुलकर्णी, उपकुलसचिव रणजित यादव यांच्यासह विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button