आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्तान संघर्ष : तालिबानी आहेत तरी कोण?

नंदू लटके

अमेरिकेने २००१मध्ये तालिबान ला अफगाणिस्तान च्या सत्तेतून खाली खेचले; पण आता तालिबानी पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा कब्‍जा घेण्याच्या जवळ पोहोचलं आहेत. त्‍यांनी अफगाणिस्तान मधील महत्त्वाची शहरे, सैनिकी तळ, गावं ताब्यात घेतली आहेत. २०१८ आणि २०२०मध्ये अमेरिका आणि तालिबानमध्‍ये चर्चा झाली होती. आता तालिबानकडून अफगाण सिक्युरिटी फोर्स यांच्यावर हल्ले केले जात आहेत.  या निमित्ताने तालिबानी म्हणजे नेमके कोण आणि त्यांचा इतिहास काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

तालिबान म्हणजे काय?

पश्तू भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. अफगाणिस्तानातून सोव्हिएट सैन्याने माघार घेतल्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाला. धार्मिक समारंभातून तालिबानचा उदय झाला,  असं मानलं जात. कडवट सुन्नी इस्लामचा प्रचार करणाऱ्या या सभांना सौदी अरेबियातून पैसा मिळत होता.

सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबान देत होतं.

१९९५ला तालिबानने अफगाणिस्तानातील हेरात हा प्रांत ताब्यात घेतला, त्यानंतर एकाच वर्षात त्यांनी काबूल ताब्यात घेतलं.

१९९८पर्यंत जवळपास ९० टक्के अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेला.

तालिबानने शरियत कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती. पुरुषांना दाढी ठेवणं, महिलांना बुरखा सक्ती करण्यात आली होती.

टीव्ही, संगीत, सिनेमा, १० वर्षांवरील मुलींच्या शिक्षणाला बंदी असे बरेच कायदे करण्यात आले.

२००१मध्ये मध्य अफगाणिस्तानातील बमियान बुद्धाच्या प्राचीन मूर्ती पाडण्यात आल्याने त्याचा जगभरात निषेध झाला होता.

तालिबानच्या निर्मिती मागे काही हात नसल्याचं पाकिस्तानने वारंवार म्हटलं असलं तरी तालिबानच्या चळवळीत सहभागी बहुतांश युवक हे पाकिस्तानातील मदरशामध्‍ये शिकलेले होते.

तालिबानच्या सत्तेला मान्यता देणाऱ्या जगातील ३ देशांपैकी पाकिस्तान एक होतं. नंतर तालिबानचा पाकिस्तानला धोका निर्माण झाला हा भाग वेगळा.

२०१२मध्ये मलाला युसूफझाई या शालेय मुलीवर तालिबानने गोळीबार केल्यानंतर त्याचे पडसाद जगभरात उमटले होते.

अल-कायदाला पाठबळ

११ सप्टेंबर २००१ राेजी अल-कायदाने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. अल-कायदा आणि ओसामा बिन लादेन याला आश्रय देणारे तालिबानचं होते.

७ ऑक्टोबर २००१ राेजी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्ताची मोहीम हाती घेतली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तालिबानचा पाडाव झाला. तालिबानचा म्होरक्या मुल्ला मोहम्मद ओमर आणि अल-कायदाचा म्होरक्या लादेन यांनी अफगाणिस्तानमधून पलायन केलं.

असं मानलं जातं की, तालिबानच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या क्वेट्टा या शहरात आश्रय घेतला. तेथून ते तालिबानचा कारभार चालवत होते.

परदेशी फौजांची मोठी संख्या असूनही तालिबानने अफगाणिस्तानच्या बऱ्याच भागावर परत कब्‍जा मिळवला होता.

ऑगस्ट २०१५मध्ये तालिबानने मुल्ला ओमरचा मृत्यू पाकिस्तानातील एका हॉस्पिटलमध्ये झाल्याचं जाहीर केलं आणि त्या जागी मुल्ला मन्सूरची नियुक्ती केल्याचं जाहीर केलं.

२०१६ला मुल्ला मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला.

परदेशी सैनिकांची माघार

२०२०मध्‍ये अमेरिका-तालिबान यांच्यात शांतता करार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण अमेरिकी सैन्य माघारी बोलवण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या हाती पडत आहे.

'नाटो'ने व्यक्त केलेल्या अंदाजनुसार सध्या तालिबानकडे ८५ हजार सैनिक आहेत.

अफगाणिस्तानात आता नव्या नगरी संघर्षांची सुरुवात होऊन त्याचा धोका संपूर्ण जगाला भेडसावणार आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ : कोल्हापूरकरांनी जपलीय स्वातंत्र्यवीरांची रक्षा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT