Vladimir Putin x
आंतरराष्ट्रीय

Putin peace talks | रशिया-युक्रेन युद्ध थांबणार ? व्लादिमीर पुतिन शांतता चर्चेसाठी तयार; मात्र ठेवली 'ही' अट

Putin peace talks | युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचाही पुढाकार; 50 दिवसांत तोडगा न निघाल्यास निर्बंध वाढणार असल्याचा ट्रम्प यांचा इशारा

Akshay Nirmale

Vladimir Putin peace talks

मॉस्को ः रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकालीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबत शांतता चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

मात्र, त्यासाठी रशियाचे "मुख्य उद्दिष्ट" पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते पण, पुतिन यांची महत्वाची अट या शांतता चर्चेतील अडथळा आहे.

क्रेमलिनने दिली माहिती...

रशियन राज्यकारभार जिथून चालतो त्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियाच्या राज्य माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "राष्ट्राध्यक्ष पुतिन अनेक वेळा सांगत आले आहेत की, युक्रेनमधील संघर्षाचा शांततामय मार्गाने शेवट व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. ही एक गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण शांततेसाठीचा प्रयत्न सुरू आहेत."

पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले की, "आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं उद्दिष्ट गाठणं. ती उद्दिष्टे स्पष्ट आहेत." मात्र, त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. रशिया युद्ध थांबवेल, पण सामरिक व राजकीय उद्दिष्टे गाठल्याशिवाय नाही.

काय आहेत रशियाची ‘मुख्य उद्दिष्टे’?

रशियाने अधिकृतरित्या त्यांची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट शब्दांत सांगितलेली नसली, तरी मागील निवेदनांवरून आणि युद्धाच्या प्रवाहावरून खालील गोष्टी अपेक्षित असाव्यात-

डोनबास प्रदेशावरील पूर्ण नियंत्रण- डोनेट्स्क आणि लुहांस्क – हे दोन रशियाप्रणीत "स्वतंत्र" घोषित केलेले भाग

युक्रेनचा NATO व युरोपियन युनियनमध्ये प्रवेश रोखणे- रशियाला वाटते की युक्रेन NATOमध्ये गेल्यास, पश्चिमी ताकदी थेट रशियाच्या सीमांवर पोहोचतील

क्रीमिया रशियाचा भाग म्हणून कायमस्वरूपी मान्यता मिळणे

युक्रेनमध्ये 'डिमिलिटरायझेशन' आणि 'डिनाझीफिकेशन' (हे शब्द रशियाने वापरले आहेत, ज्याचा अर्थ त्यांनी असा लावला आहे की युक्रेनची लष्करी ताकद कमी व्हावी आणि कथित 'अतिउजव्या विचारसरणी'चा प्रभाव कमी व्हावा)

युक्रेनचाही पुढाकार

दरम्यान, युक्रेननेही पुन्हा एकदा शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, "आमच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उमेरोव यांनी रशियन प्रतिनिधींना पुढील आठवड्यात भेटीसाठी प्रस्ताव दिला आहे. या चर्चांना गती देणं अत्यंत आवश्यक आहे."

अमेरिकेचा रशियाला निर्बंधांचा इशारा

युक्रेनकडून शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला जात असतानाच, अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसाठी नव्या शस्त्रास्त्र मदतीची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी रशियन निर्यातीचे खरेदीदार लक्षात घेऊन कडक निर्बंध लावण्याचा इशाराही दिला आहे, जोपर्यंत रशिया ५० दिवसांत शांततेसाठी तयार होत नाही.

शांततेसाठी यापुर्वीचे प्रयत्न

याआधी इस्तंबूलमध्ये दोन वेळा रशिया-युक्रेन शिखर परिषद झाली होती. मात्र या बैठकीत शस्त्रसंधीवर कोणतीही ठोस प्रगती झाली नव्हती. मात्र, त्यातून कैद्यांची देवाणघेवाण आणि मृत सैनिकांचे मृतदेह परत देण्यावर मात्र सहमती झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT