प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Pluto planet status | प्लूटो पुन्हा 'ग्रह' होणार? 'नासा' प्रशासकांच्‍या एका विधानामुळे जगभरात चर्चा सुरू!

Pluto planet status |नासाकडून आगामी काळात मांडण्‍यात वैज्ञानिक पुराव्यांवर होणार निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Pluto planet status

सुमारे २० वर्षांपूर्वी ज्या वादावर पडदा पडला असे वाटले होते, तो 'प्लूटो'चा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नासाच्या २०२७ च्या अर्थसंकल्पीय विनंतीवर नुकत्याच झालेल्या सिनेट सुनावणीदरम्यान, नासाचे प्रशासक जॅरेड आयझॅकमन यांनी केलेल्‍या विधानामुळे प्लूटोला पुन्हा एकदा 'ग्रह' म्हणून घोषित करावे का?, या प्रश्‍नावर चर्चा सुरु झाली आहे.

२००६ मध्ये IAUने प्लूटोचे स्थान बदलले

१९३० मध्ये शोध लागल्यापासून प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह मानले जात असे. मात्र, २००६ मध्ये 'इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन'ने (IAU) ग्रहाची अधिकृत व्याख्या जाहीर केली आणि प्लूटोचे स्थान बदलले.

खगोलीय वस्तूला ग्रह मानण्‍यासाठी 'या' तीन अटी पूर्ण करणे आवश्‍यक

IAU च्या नियमांनुसार, एखाद्या खगोलीय वस्तूला ग्रह मानण्यासाठी तीन अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. संबंधित खगोलीय वस्तू सूर्याभोवती फिरणारी असावी.

२. गुरुत्वाकर्षणामुळे तिला गोलाकार स्वरूप प्राप्त होईल इतके तिचे वस्‍तुमान असावे

३. खगोलीय वस्‍तूने आपल्या कक्षेतील इतर कचरा (debris) किंवा लहान खडक साफ केलेले असावेत.

प्लूटो तिसरी अट पूर्ण करू शकला नाही

प्लूटो पहिल्या दोन अटी पूर्ण करतो, पण तिसरी अट पूर्ण करू शकला नाही. प्लूटो हा 'कायपर बेल्ट'मध्ये स्थित आहे, जिथे त्याच्यासारखे अनेक बर्फाळ गोल आहेत. आपल्या कक्षेवर पूर्ण वर्चस्व गाजवण्याइतकी गुरुत्वाकर्षण शक्ती प्लूटोकडे नसल्यामुळे, 'इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन'ने त्याचे वर्गीकरण 'खुजा ग्रह' असे केले आहे.

नासाच्‍या वैज्ञानिकांचे शोधनिबंधांवर काम सुरु

कॅन्सासचे रिपब्लिकन सिनेट सदस्य जेरी मोरन यांनी नुकताच यावर भाष्‍य केले. मोरन यांच्यासाठी हा विषय भावनिक आहे, कारण प्लूटोचा शोध लावणारे क्लाईड टॉमबॉग हे कॅन्सासचे रहिवासी होते. याबाबत बोलताना नासाचे प्रशासक जॅरेड आयझॅकमन म्हणाले की, प्लूटोला ग्रहाचा दर्जा पुन्हा मिळवून देण्याच्या मताशी ते सहमत आहेत. त्यांनी माहिती दिली की, नासा सध्या काही वैज्ञानिक शोधनिबंधांवर काम करत आहेत. हा मुद्‍दा पुन्‍हा एकदा वैज्ञानिक समुदायासमोर मांडला जाईल.

गेल्या दशकातील घडामोडींमुळे उत्सुकता वाढली

गेल्या दशकातील घडामोडींमुळे ही उत्सुकता वाढली आहे. जुलै २०१५ मध्ये, नासाच्या 'न्यू होरायझन्स' या अंतराळयानाने प्लूटोचे पहिले जवळून फोटो पाठवले होते. या फोटोंनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या जगाचे दर्शन घडवले. तिथे पर्वत, नायट्रोजन-बर्फाच्या हिमनद्या आणि भूगर्भीय विविधता दिसून आली. यामुळे प्लूटोबद्दलचे जुने अंदाज खोटे ठरवले. खगोलीय संस्थांना नावे देणारी एकमेव जागतिक संस्था 'IAU' ने अद्याप २००६ च्या निर्णयाचा पुनर्विचार केलेला नाही. तूर्तास, प्लूटो अधिकृतपणे 'खुजा ग्रह'च आहे. त्याचे भविष्य आता नासा आगामी काळात मांडणाऱ्या वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT