US Iran War Update: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींबाबतची बोलणी अजूनही अविश्वासाच्या वातावरणात अडकली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तोडगा निघेपर्यंत शस्त्रसंधी वाढत असल्याचं जाहीर करूनही इराण चर्चेच्या टेबलवर येण्यास नकार देत आहे. तिकडं अमेरिकेने इराणाची होर्मुझमध्ये केलेली नाकाबंदी अजून सुरूच असून याचा परिणाम जागतिक ऊर्जा व्यापार आणि बाजारावर झाला आहे.
त्यातच आता गुरूवारी युएस नेव्ही सचिव जॉन फेलन यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिली आहे. त्यांनी हा राजीनामा तात्काळ प्रभावानं दिल्यानं चर्चांना ऊत आला आहे. जॉन यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून कळते. हा वाद इराण युद्धाबाबत झाला होता. आता ह्युंग काओ हे नेव्ही सेक्रेटरी म्हणून काम पाहणार आहेत.
युद्धाचा केंद्रबिंदू ठरलेल्या होर्मुझमधील वातावरण आता तणावपूर्ण बनत आहे. हा समुद्री मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. अमेरिकेने इथं ब्लॉकेड लावला असून इराणने देखील जोपर्यंत हा ब्लॉकेड हटवण्यात येत नाही तोपर्यंत होर्मुझ बंद राहील असे जाहीर करून टाकलं आहे. यामुळं तेलाच्या किंमती या जवळपास ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच त्याचा पुरवठाही धोक्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी सुरू राहील. वॉशिंग्टन सध्या इराणच्या प्रस्तावाची वाट पाहत आहे. अमेरिकेचा उपराष्ट्रपती जेडी वॅन्स यांनी नुकतेच पाकिस्तानचा आपला दौरा रद्द केला आहे. पाकिस्तान इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करत असून चर्चेची पहिली फेरी ही इस्लामाबादमध्ये झाली होती.
अमेरिकेत व्हाईट हाऊस प्रवक्त्या केरोलीन लिआविट्ट यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची मुदतवाढीसाठी कोणतीही डेडलाईन ठरवलेली नाही.
इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कीन यांनी सांगितलं की इराणला चर्चा आणि करार हवा आहे मात्र दिलेलं वचन न पाळणं आणि ब्लॉकेड लावणं, धमकी देणं हे वाटाघाटीतील मुख्य अडथळे आहेत.
इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की शांती वार्ता थांबली आहे कारण अमेरिकेनं आमच्या बंदरांबाहेर नाकाबंदी लावली आहे. याचबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स यांनी दावा केला ही त्यांनी दोन परदेशी जहाजे स्ट्रेट हॉफ होर्मुझमध्ये पकडल्या आहेत. तिसऱ्या जहाजावर समुद्री नियम मोडल्याबद्दल गोळीबार करण्यात आला होता. असंही त्यांनी सांगितलं.