आंतरराष्ट्रीय

Hormuz Strait crisis : 'होर्मुझ' पुन्हा बंद!

कतारसह ६ देशांवर इराणचे हल्ले; अमेरिकेकडून १४० लष्करी ठाणी लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

  • भारतीय व्यापारी जहाजावर हल्ला; १० जण बचावले, ९ बेपत्ता

  • अमेरिकेचा हस्तक्षेप थांबेपर्यंत 'होर्मुझ' बंदच राहणार : इराण

  • मध्य पूर्वेसह जगभरात पुन्हा अस्वस्थता; इंधनाचे दर भडकण्याची शक्यता

वॉशिंग्टन/तेहरान/दुबई : मध्य पूर्वेतील अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. इराणने ओमान, जॉर्डन, कतारसह अमेरिका समर्थक ६ देशांवर जोरदार हल्ले चढवले. अमेरिकेनेही इराणच्या प्रमुख लष्करी ठाण्यांवर १४० ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले. अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझच्या सामुद्रधुनीचा जलमार्ग पुन्हा एकदा बंद केल्याचे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने रविवारी जाहीर केले. होर्मुझ बंद केल्याने इंधन दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी परिस्थिती चिघळली. मान्यता नसलेल्या मार्गावरून जाणाऱ्या जहाजावर इशारा-यादाखल गोळीबार केल्यानंतर हा जलमार्ग बंद केल्याचे इराणने म्हटले होते, तसेच रविवारी दुसऱ्या जहाजाचे नुकसान झाल्याचे सांगितले. या प्रदेशातील अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील, असे इराणने म्हटले आहे.

इंधनाच्या किमती वाढण्याची भीती या युद्धामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे, तर इराणने या जलमार्गाची कोंडी केल्यामुळे ऊर्जेच्या (इंधनाचा) किमती आणखी वाढून जागतिक महागाई भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या (संसदेच्या) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्यासाठी वाढत्या किमती विशेषतः पेट्रोलच्या किमती राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत.

'होर्मुझ'मधील जहाजांना संरक्षण : अमेरिका

होर्मुझ ही कोणत्याही देशाची मक्तेदारी नाही. त्यामुळे तेथून वाहतूक करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे सेंटकॉमने रविवारी रात्री उशिरा जाहीर केले. होर्मुझवरील कोणत्याही देशाची मक्तेदारी मान्य करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

मध्यस्थ देशावर हल्ला

रविवारी कतारवर झालेला हल्ला अशा देशावर होता, ज्याचे मध्यस्थीचे प्रयत्न अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदीसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. हल्ले होत राहतील, तोपर्यंत मध्यस्थ म्हणून काम करणार नाही, असे कतारने म्हटले आहे.

  1. ९ बेपत्ता, १० सुरक्षित : जहाजावरील १९ भारतीयांपैकी १० जणांना सुरक्षित वाचवले असून एकाचा शोध सुरू आहे.

  2. परराष्ट्र मंत्रालयाचा निषेध : व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधा लक्ष्य करणे त्वरित थांबवण्याचे भारताचे आवाहन.

  3. ओमानचे आभार : बचाव कार्यात मोलाची मदत केल्याबद्दल भारताकडून ओमान प्रशासनाचे आभार व्यक्त.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT