US Iran Hormuz Talks: मोठी घडामोड! होर्मुझवरून अखेर अमेरिका-इराण नरमले; युद्ध थांबवून दोहात निर्णायक चर्चा करणार

US Iran Hormuz Talks: अमेरिका आणि इराण यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
US Iran Hormuz Talks
US Iran Hormuz TalksPudhari
Published on
Updated on

US Iran Hormuz Talks: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांचे प्रतिनिधी मंगळवारी कतारची राजधानी दोहा येथे भेटणार असून होर्मुझ सामुद्रधुनीतील वाद आणि जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीवर चर्चा करणार आहेत.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ड्रोन हल्ले आणि इतर आक्रमक लष्करी हालचाली सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या संघर्षात काही प्रमाणात शिथिलता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही देश तणाव कमी करण्यावर सहमत झाले असून होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक सध्या सुरळीत सुरू राहील. दोहा येथे होणाऱ्या बैठकीत या कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींवरही चर्चा होणार आहे.

मात्र, सुमारे अकरा दिवसांपूर्वी केलेली युद्धविरामाची (सीजफायर) घोषणा अद्यापही चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा देत म्हटले आहे की, इराणने कराराच्या अटींचे पालन केले नाही, तर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचा विशेष अधिकार इराणकडेच असल्याचा दावा केला आहे. मात्र, अमेरिकेने हा दावा फेटाळून लावत ही सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग असून सर्व देशांच्या जहाजांसाठी ती निर्बंधांशिवाय खुली राहिली पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

US Iran Hormuz Talks
France Heatwave Deaths | हिट वेव्हमुळे फ्रान्समध्ये हजारहून अधिक मृत्यू; युरोपमधील १६ देशांत विक्रमी तापमान

हा वाद अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी होर्मुझ सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिका आणि इराणमध्ये लष्करी कारवाया झाल्या होत्या. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, ओमान किनाऱ्याजवळील जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर त्यांनी इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि लष्करी ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले.

याउलट, इराणने अमेरिकेच्या कारवायांच्या निषेधार्थ बहरीनमधील अमेरिकी नौदल तळ आणि कुवेतमधील हवाई तळावर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केल्याचा दावा केला आहे. मात्र, अमेरिकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व हल्ले हवेतच थांबवण्यात आले किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. कुवेत आणि बहरीन सरकारांनीही या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये अद्याप मतभेद कायम आहेत. त्यामुळे दोहा येथे होणारी बैठक या वादावर तोडगा काढण्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news