Donald Trump Iran statement
वॉशिंग्टन : मी इराणमधील सत्ता बदलली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये लवकरच एक मोठा करार होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत इराणकडे तडजोड करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. २१) 'CNBC न्यूज'शी बोलताना केला.
इराणबरोबर करार झाला नाही तर अमेरिकन लष्कर हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि आदेश मिळताच कारवाई केली जाईल. माझ्याकडे जास्त वेळ नाही. युद्धविरामाच्या काळात अमेरिकेने आपली लष्करी ताकद वाढवली आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूगोळा उपलब्ध असून आम्ही या वेळेचा वापर पूर्ण तयारीसाठी केला आहे," असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आज पाकिस्तानसाठी रवाना होणार आहेत. वेंस यांच्यासोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे देखील पाकिस्तानला पोहोचणार आहेत.
अमेरिकेने सीजफायरचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर आता इराणनेही पलटवार केला आहे. इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, खुद्द अमेरिकेनेच युद्धविराम मोडला आहे. रविवारी ओमानच्या आखातात एका अमेरिकन युद्धनौकेने इराणचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर गोळीबार केला. अमेरिकेचा असा दावा आहे की, हे जहाज त्यांच्या सागरी नाकेबंदीतून निसटण्याचा प्रयत्न करत होते. याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या लष्कराने ही कारवाई म्हणजे 'चाचेगिरी' असल्याचे म्हटले असून हे सीजफायरचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे.