Donald Trump Iran Peace Deal  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Trump Iran Peace Deal : इराणसोबतचा शांतता करार 'अंतिम नाही' : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

करारातील अटी पाळल्‍या नाही तर इराणवर पुन्‍हा हल्‍ला करु

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump On Iran Peace Deal : इराणसोबत झालेला करार हा अंतिम नाही, तो केवळ एक "सामंजस्य करार" (MoU) आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. " हा अंतिम करार नाही. हा फक्त एक सामंजस्य करार आहे. इराणने करारातील अटी पाळल्‍या नाहीतर आम्ही त्यांच्यावर पुन्हा गोळीबार आणि बॉम्बफेक सुरू करू," असा इशारा अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी आज दिला. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण अधिकृतपणे या करारावर स्वाक्षरी करणार असल्याच्या अवघ्या दोन दिवस आधी फ्रान्समधील G7 शिखर परिषदेत ट्रम्प यांनी केलेले विधानाने खळबळ माजली आहे.

तो एक सामंजस्‍य करार

फ्रान्समधील G7 शिखर परिषदेत बोलताना ट्रम्प म्‍हणाले, "इराणसोबत झालेला करार हा अंतिम नाही. तो एक सामंजस्‍य करार आहे." अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुकारलेले युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वॉशिंग्टन आणि तेहरान १९ जून रोजी एका अंतरिम करारावर अधिकृतपणे स्वाक्षरी करणार आहेत. तत्‍पूर्वी ट्रम्‍प यांनी या कराराबाबतच संभ्रमित करणारे विधानाला महत्त्‍वप्राप्‍त झाले आहे.

लेबनॉनमधील युद्धबंदीचे ८४ वेळा उल्लंघन झाल्‍याचा इराणाचा आरोप

तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यापासून इस्रायलने ८४ वेळा लेबनॉनमधील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला आहे. हे हल्ले थांबले नाहीत तर "कडक प्रत्युत्तर" दिले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये चार जणांना ठार केल्यानंतर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना लेबनॉनमध्ये "अधिक जबाबदारीने" वागण्याचे आवाहन केल्यानंतर हा इशारा समोर आला आहे.

कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप जाहीर नाही

या कराराचे मुख्य तपशील अद्याप समोर येत असले तरी, या सामंजस्य करारामुळे इराणचा अणुकार्यक्रम आणि इतर प्रलंबित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ६० दिवसांच्या चर्चेचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. या कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

इराणचे परराष्‍ट्र मंत्री अब्‍बास अराघची सावध भूमिका

अमेरिका आणि इराण महिनाभराचा संघर्ष संपवण्यासाठी कराराच्या जवळ पोहोचले असले, तरी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, "आमच्याकडे वचनभंग आणि करार मोडीत काढल्याचा इतिहास आहे... हे सर्व आमच्या लक्षात आहे." दरम्‍यान, इराण आणि अमेरिकेने डिजिटल माध्यमाद्वारे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने युद्ध संपण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, इराण अणुकेंद्रांबाबत खरोखरच तडजोड करेल का, याबद्दल अमेरिकन गुप्तहेर संघटनांना 'गंभीर' शंका असल्याचे वृत्त 'ॲक्सिओस'ने दिले आहे.

इस्रायल आणि लेबनॉन देखील कराराच्या कक्षेत

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी सुचवले आहे की, इस्रायल आणि लेबनॉन देखील या कराराच्या कक्षेत येतात, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल या अटींना बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवार, १८ जूनपासून हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल असे दोन्ही बाजूंनी म्हटले असले, तरी जहाज कंपन्या अजूनही सावध आहेत. सेवा पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी युद्धबंदी टिकते की नाही, याची ते वाट पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT