

Iran US peace deal
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण दरम्यान एका महत्त्वाच्या शांतता करारावर वाटाघाटी सुरू आहेत. या कराराचा भाग म्हणून इराण आपल्याकडील युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार झाला आहे. अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी 'द न्यूयॉर्क टाइम्स'ला ही माहिती दिली. या निर्णयामुळे पश्चिम आशियातील संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि इराणमधील शत्रुत्व संपवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मूझ समुद्र मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ आले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहिर केले होते. ट्रम्प यांनी या कराराचा तपशील जाहीर केला नसला, तरी इराणने अण्वस्त्र बनवण्यासाठी उपयुक्त असलेला आपला युरेनियमचा साठा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील ३० ते ६० दिवसांत या संवर्धित युरेनियमच्या साठ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवला जाऊ नये, असे आदेश दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, आता इराणने घेतलेली माघार हा या संपूर्ण प्रक्रियेतील खूप मोठा आणि अनपेक्षित बदल मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार, इराणकडे सध्या ६० टक्के शुद्धता असलेले सुमारे ४०० किलो युरेनियम आहे. या साठ्यापासून इराण एकापेक्षा जास्त अणुबॉम्ब बनवू शकतो, असा दावा इस्रायलने सातत्याने केला होता.
इराणने या प्राथमिक करारात युरेनियम साठ्याबाबत ठोस आश्वासन द्यावे, अशी अट अमेरिकेने ठेवली होती. तसे न झाल्यास चर्चा फिस्कटून पुन्हा लष्करी कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा अमेरिकेने दिला होता. अमेरिकेने इराणच्या 'इस्फहान' अणू केंद्रातील भूमिगत युरेनियम साठे नष्ट करण्यासाठी 'बंकर-बस्टर' बॉम्ब वापरण्याचा किंवा इस्रायलसोबत मिळून गुप्त कमांडो कारवाईद्वारे हा साठा जप्त करण्याचाही प्लॅन तयार केला होता.