Tomahawk vs Shahab Missiles Pudhari
आंतरराष्ट्रीय

Tomahawk vs Shahab Missiles: विध्वंसक टॉमहॉक विरुद्ध शहाब; विनाशक शस्त्रांचा मारा

अमेरिका-इस्रायलकडून इराणवर मिसाईल्स, ड्रोन्सचा हल्ला; इराणकडूनही प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

तेहरान/वॉशिंग्टन : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. इराणच्या सत्तेचा कणा मोडण्यासाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेला ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’ नाव देण्यात आले होते. या मोहिमेत केवळ लढाऊ विमानेच नव्हे, तर ‌‘कामिकाझे‌’ ड्रोन आणि क्रूझ मिसाईल्सचा असा वापर करण्यात आला की, इराणची प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स) पूर्णपणे हतबल ठरली.

टॉमहॉक मिसाईल्सचा ‌’प्रिसिजन‌’ स्ट्राईक

या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अमेरिकेची ‌‘टॉमहॉक‌’ क्रूझ मिसाईल्स. समुद्रातून डागता येणारी ही क्षेपणास्त्रे 1600 किलोमीटर अंतरावरून अचूक मारा करण्यासाठी ओळखली जातात. 20 फूट लांब आणि सुमारे 1510 किलो वजनाच्या या एका मिसाईल्सची किंमत करोडो रुपये आहे. अत्यंत सुरक्षित आणि बंकरसारख्या ठिकाणी लपलेल्या लक्ष्याला उद्ध्वस्त करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या ‌‘सेंटकॉम‌’ने या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाचे फोटो जारी करत या कारवाईची पुष्टी केली आहे. इस्रायलने डेलिलाह आणि रॅम्पेजसारखी स्टँड ऑफ मिसाईल्स वापरली आहेत, जी विमानाला शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या कक्षेबाहेर राहूनच हल्ला करण्याची सुविधा देतात.

इराणनेही डागली महाविनाशक क्षेपणास्त्रे

इराणनेदेखील गप्प न बसता आपल्या क्षेपणास्त्र साठ्याचा वापर सुरू केला आहे. इराणकडे मध्य पूर्व आशियातील सर्वात मोठा क्षेपणास्त्र साठा असून, त्यांनी शहाब-3 आणि इमाद यांसारखी मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागली आहेत. याशिवाय खोर्रमशहर आणि सेज्जिल ही 2000 कि.मी.पर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे संपूर्ण मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांना टार्गेट करत आहेत. ही क्षेपणास्त्रे ध्वनीपेक्षा वेगाने प्रवास करत असल्याने त्यांना हवेत रोखणे अत्यंत कठीण असते.

जीबीयू 28 बंकर-बस्टर बॉम्बचाही प्रहार

जमिनीखालील बंकर्स आणि अणुकेंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने 5000 पाऊंड वजनाचे जीबीयू 28 ‌‘बंकर-बस्टर‌’ बॉम्ब वापरले आहेत. इस्रायलने आपली एफ-35 अदिर ही स्टेल्थ लढाऊ विमाने इराणच्या हवाई हद्दीत घुसवली असून, ही विमाने शत्रूच्या रडारला चकवा देण्यात माहीर आहेत.

‌‘ल्युकास‌’ कामिकाझे ड्रोन्सचा पहिलाच वापर

या युद्धात अमेरिकेने प्रथमच आपल्या ‌‘ल्युकास‌’ या कामिकाझे ड्रोनचा वापर केला. विशेष म्हणजे, हे ड्रोन इराणच्याच शाहेद-136 ड्रोनच्या धर्तीवर बनवण्यात आले आहेत. इराण ज्या तंत्रज्ञानाने जगाला धमकवत असे, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकेने इराणवर प्रहार केला. हे ड्रोन्स जमिनीवरून डागण्यात आले होते. या एका ड्रोनची किंमत 35 हजार डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) इतकी असून, ते मिसाईल्सच्या तुलनेत अत्यंत स्वस्त पण तितकेच प्रभावी ठरले.

स्टेल्थ फायटर जेटस्‌‍ची साथ

या संपूर्ण मोहिमेत केवळ ड्रोन्स आणि मिसाईल्सच नव्हते, तर अमेरिकेची एफ-35 आणि एफ/ए-18 सारखी अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमानेही सहभागी होती. इस्रायली हवाई दलाने खामेनी यांच्या तेहरानमधील मुख्य निवासस्थानाला लक्ष्य केले. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या मोहिमेचे वर्णन ‌‘सर्वात अचूक आणि घातक हवाई कारवाई‌’ असे केले आहे.

स्वॉर्म तंत्रज्ञान आणि स्टारलिंकची जोड

‌‘ल्युकास‌’ ड्रोन्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते थव्याने (स्वॉर्म) हल्ला करू शकतात. शत्रूच्या रडार यंत्रणेला नेमका कोणता ड्रोन पाडायचा, हे समजत नाही. ‌‘स्टारलिंक‌’ टर्मिनल बसवण्यात आले होते. अत्यंत दुर्गम भागातही त्यांना हाय स्पीड कनेक्टिव्हिटी मिळाली आणि टार्गेटिंग अधिक अचूक झाले. हे ड्रोन्स 1500 ते 2500 कि.मी. प्रवास करून 40 ते 50 किलो स्फोटके वाहून नेतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT