एलन मस्‍क यांच्‍या 'स्पेसएक्स'चे सर्वात शक्तिशाली स्पेसक्राफ्ट 'स्टारशिप'ची यशस्वी चाचणी झाली.  Image Source : X
आंतरराष्ट्रीय

SpaceX Starship test flight |एलन मस्क यांच्या 'स्पेसएक्स स्टारशिप'ची मोहीम फत्ते! हिंदी महासागरात 'स्प्लैशडाउन'!

SpaceX Starship splashdown Indian Ocean | हिंदी महासागरात लँडिंग करताच जोरदार स्फोट

पुढारी वृत्तसेवा

SpaceX Starship splashdown Indian Ocean

टेक्सास : मानवाला चंद्र आणि मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याचा दावा करणारे एलन मस्क यांचे सर्वात महत्त्वाकांक्षी स्पेसक्राफ्ट 'स्टारशिप' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांची कंपनी 'स्पेसएक्स'चे (SpaceX) सर्वात शक्तिशाली स्पेसक्राफ्ट 'स्टारशिप'ची (Starship) यशस्वी चाचणी झाली आहे. टेक्सासवरून लॉन्च झालेल्या रॉकेटने अंतराळात यशस्वी उड्डाण केल्यानंतर हिंदी महासागरात लँडिंग करताच त्याचा जोरदार स्फोट (स्प्लैशडाउन) झाला. समुद्राच्या मध्यभागी झालेल्या या स्फोटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, एलन मस्क यांच्या मालकीची ही कंपनी आतापर्यंतचा सर्वात मोठा 'आयपीओ' (IPO) आणण्याच्या तयारीत असतानाच ही यशस्वी चाचणी पार पडली आहे.

मस्क यांची 'स्टारशिप' पुन्हा एकदा चर्चेत

मानवाला चंद्र आणि मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याचा दावा करणारे एलन मस्क यांचे सर्वात महत्त्वाकांक्षी स्पेसक्राफ्ट 'स्टारशिप' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पेसएक्सच्या स्टारशिपने टेक्सासवरून उड्डाण केल्यानंतर हिंदी महासागरात 'हार्ड स्प्लैशडाउन' म्हणजेच पाण्यात लँडिंग केले. या लँडिंगच्या अवघ्या काही सेकंदांतच एका प्रचंड स्फोटासह रॉकेटचे टुकड़े झाले. स्पेसएक्सच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा कोणताही अपघात नसून त्यांच्या नियोजनाचाच एक भाग होता.

स्पेसएक्सच्या 'स्टारबेस फॅसिलिटी'वरून उड्डाण

शनिवारी सुमारे एका तासाच्या मिशननंतर, स्टारशिपला हिंदी महासागरातील अगदी अचूक ठिकाणी यशस्वीरित्या उतरवण्यात आले. या शक्तिशाली रॉकेटने टेक्सास येथील स्पेसएक्सच्या 'स्टारबेस फॅसिलिटी'वरून उड्डाण केले होते. कंपनीच्या 'सुपर हेवी बूस्टर'द्वारे हे रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. एलन मस्क यांची कंपनी या नेक्स्ट-जेन रॉकेट सिस्टमला भविष्यात मानवाला चंद्र आणि मंगळावर पाठवण्यासाठी तयार करत आहे.

अंतराळाची प्रदक्षिणा करून माघारी

लॉन्चिंगनंतर स्टारशिप आपल्या बूस्टरपासून वेगळे झाले. अंतराळात पृथ्वीची प्रदक्षिणा घालत पुन्हा धरतीकडे परतले. शास्त्रज्ञांनी याच्या लँडिंगसाठी हिंदी महासागरातील एका निर्जन भागाची आधीच निवड केली होती, जिथे स्पेसएक्सची टीम आणि ट्रॅकिंग शिप्स आधीपासूनच तैनात होत्या. स्टारशिपचे हे एकूण १२ वे उड्डाण होते, पण गेल्या ७ महिन्यांतील हे पहिलेच उड्डाण होते.

शेवटच्या सेकंदाला नक्की काय घडले?

स्टारशिप पृथ्वीच्या वातावरणात परतले, तेव्हा त्याचा वेग कमी करण्यासाठी 'लँडिंग बर्न' प्रक्रिया सुरू करण्यात आली. पाण्यात पडण्यापूर्वी अवघ्या काही सेकंद आधी रॉकेटने स्वतःला सरळ (लँडिंग ओरिएंटेशन) केले, हे या मिशनमधील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काम मानले जात होते. 'स्टारशिप'ने पाण्याचा पृष्ठभाग स्पर्श केला, तसाच तिथे एक अतिशय मोठा स्फोट झाला. अंतिम स्प्लैशडाउन जरी स्फोटक आणि आगीने वेढलेले असले, तरी ते नियोजनानुसार पूर्णपणे नियंत्रित होते. कंपनीने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, "स्प्लैशडाउन निश्चित झाले आहे!" या थरारक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कंपनीने स्पष्ट केले आहे की, हा स्फोट नेमका त्याच ठिकाणी झाला जिथे त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे हे मिशन पूर्णपणे यशस्वी झाले आहे.

मोहिमेमागे स्पेसएक्सचा मुख्य उद्देश हेतू काय होता?

स्पेसएक्सचा मुख्य उद्देश उड्डाणादरम्यान त्यांच्या नवीन डिझाइनची क्षमता सिद्ध करणे हा होता. एका इंजिनने काम करणे बंद केले असूनही, तिसऱ्या पिढीच्या या स्टारशिप स्पेसक्राफ्टने हवेत स्वतःला सरळ केले. स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंजिन पुन्हा सुरू करून दाखवले. रॉकेटने आपल्यासोबत नेलेले २२ डमी सॅटेलाईट्स (Mock Satellites) यशस्वीरित्या तैनात केले. यापैकी दोन सॅटेलाईट्सनी विश्लेषणासाठी स्पेसक्राफ्टच्या 'हीट शील्ड'चे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक उड्डाणादरम्यान एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे स्पेसक्राफ्ट अंतराळात तरंगत होते, पण ते नेमक्या अचूक कक्षेत पोहोचू शकले नाही. कंपनीचे प्रवक्ते डॅन हुओट म्हणाले, "मी याला अगदी अचूक ऑर्बिटल इन्सर्शन (कक्षेत प्रवेश) म्हणणार नाही, पण तरीही हे आधीच विश्लेषण केलेल्या कक्षेच्या मर्यादेतच होते."

तुम्ही मानवतेसाठी मोठा गोल केला : एलन मस्क

एलन मस्क यांनी 'X' वर आपल्या टीमचे कौतुक करत या उड्डाणाला 'ऐतिहासिक' (Epic) म्हटले आहे. ते म्हणाले, "तुम्ही मानवतेसाठी एक मोठा गोल केला आहे."

चंद्रावर जाण्याची घाई; चीनशी स्पर्धा

स्पेसएक्सच्या प्रगतीवर खूप काही अवलंबून आहे. कारण चंद्रावर लँडिंग करण्यासाठी 'स्टारशिप'ची सुधारित आवृत्ती तयार करण्याचे कंत्राट अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) स्पेसएक्सला दिले आहे. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'च्या 'आर्टेमिस' (Artemis) मोहिमेचे उद्दिष्ट मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवणे हे आहे. दुसरीकडे, चीननेही २०३० पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नासाचे उद्दिष्ट २०२७ मध्ये अंतराळातच त्यांच्या स्पेसक्राफ्ट आणि किमान एका लूनर लँडरची भेट घडवून आणण्याची चाचणी घेण्याचे आहे. यासाठी स्पेसएक्स आणि जेफ बेझोस यांच्या मालकीची 'ब्लू ओरिजिन' (Blue Origin) या दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT