Sheikh Hasina Return To Bangladesh: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्या डिसेंबर २०२६ मध्ये भारतातून बांगलादेशमध्ये परतणार असल्याचं सांगितलं. त्या न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना जीवाचा धोका आहे. तरी देखील त्या बांगलादेशमध्ये परतण्याचा निर्णय बदलणार नाहीत असं सांगितलं आहे.
शेख हसीना यांनी रॉयटर्सला जवळपास एक तास टेलिफोनिक मुलाखत दिली. ७८ वर्षाच्या हसीना यांनी त्यांच्या सोबत अवामी लीगचे काही वरिष्ठ नेते देखील बांगलादेशमध्ये परतणार असल्याचं सांगितलं. हे सर्वजण न्यायालयाच्या प्रक्रियाचा सामना करणार आहे. शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या तख्तापलट आणि हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर देश सोडून भारतात आश्रय घेतला होता.
नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय क्राईम ट्रिब्युनलने २०२४ चे विरोधी आंदोलक चिरडणे आणि त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार धरत शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. हसीना यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
बांगलादेश सतत शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. त्याचदरम्यान, शेख हसीना यांचे हे वक्तव्य आलं आहे. हसीना यांच्या मते त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली असतानाही देशात परतावं लागणार आहे.
त्या मुलाखतीत म्हणाल्या, 'ज्यावेळी मी परत जाईन त्यावेळी ते मला अटक करू शकतात. एवढंच नाही तर माझी हत्या देखील होऊ ळकते. मात्र तरी देखील मला जावं लागेल. माझ्या पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर या घटकेला खूप अत्याचार केला जात आहेत. माझा मृत्यू व्हायचा असेल तर तो माझ्या मातीत व्हावा. माझे आई वडील ज्या ठिकाणी दफन आहेत. जिथं त्यांचं रक्त सांडलं आहे तिथंच माझा मृत्यू व्हावा.
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं आहे की भारत बांगलादेशच्या प्रत्यार्पणाच्या मागणीवर विचार करत आहे. नव्या सरकारसोबत संवाद आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचीही देखील आमची इच्छा आहे. ढाका सरकार भारताला प्रत्यार्पणासाठी सतत पत्र पाठवत आहे. मात्र शेख हसीना यांनी स्पष्ट केलं की मला कोणालाही पाठवण्याची गरज नाही. मी स्वतःच माझ्या देशात परतणार आहे.'