आंतरराष्ट्रीय

अफगाणमधील स्थितीवरून सौदी अरेबिया चिंतेत!

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : अफगाणिस्तानात दहशतवादी संघटनांना मिळालेले पुनर्जीवन हा चिंतेचा विषय आहे, असे सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैजल बिन फरहान अल सौद यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे केवळ तालिबानच्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होणार आहे, असे नाही तर अल कायदा आणि इसिससारख्या संघटनांना देखील डोके वर काढण्याची संधी मिळणार आहे, असे सौद यांनी नमूद केले.

जागतिक दहशतवाद हा समस्यांचे मूळ बनत चालला आहे, असे सांगून सौद पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसर्‍या देशांतील दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही, असे आश्‍वासन सध्या तरी तालिबानने दिलेले आहे. मात्र ते खरेच हे आश्‍वासन पाळतात का, हे पहावे लागणार आहे.

तालिबान सरकारसोबत आम्ही (Saudi Arabia) अद्याप संपर्क साधलेला नाही. याबाबत थांबा आणि वाट पहा, धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे. 1990 च्या काळात तालिबानला ज्या तीन देशांनी तालिबानला मान्यता दिली होती, त्यात सौदीचा समावेश होता. मात्र यावेळी आम्ही सावध भूमिका घेतली आहे.

तालिबानने सरकारमध्ये सर्वांना समान संधी देणे जसे गरजेचे आहे तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत वरील मुद्यावर आपण चर्चा केली आहे. त्यांनीसुध्दा आपल्या मताशी सहमती दर्शवली आहे, असे सौद यांनी नमूद केले.

भारत आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia) यांच्यादरम्यान लवकरच हवाई सेवा सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि सौदी अरेबिया यांच्यादरम्यानची हवाई सेवा बंद करण्यात आली होती.

काश्मीर प्रश्‍नावर बोलताना सौद यांनी हा भारत व पाकिस्तानदरम्यान प्रश्‍न असून त्यांनी तो सामंजस्याने सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

हे ही वाचलं का?

SCROLL FOR NEXT