Pakistan Khawaja Asif Identity: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं पाकिस्तानात मोठा भूकंप येऊ शकतो. त्यांच्या वक्तव्यामुळं पाकिस्तानात ओळख आणि इतिहास याबाबत नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. आसिफ यांनी खुलेआम पाकिस्तानातील मुलं खोटा इतिहास शिकत आहेत असं वक्तव्य केलं. देशातील लोक आपले मूळ विसरत आहेत असं देखील ते म्हणाले.
एका मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले, 'आपण पाकिस्तानी मुसलमान आपल्या हिंदू पूर्वजांचा द्वेष करतो. पाकिस्तानमधील निम्मे लोक खोटा दावा करतात की त्यांचे पूर्वज हे साऊदी अरेबिया किंवा इराणमधून आले होते. ही मानसिकता मुद्दाम तयार करण्यात आली आहे. यामुळे नवी पिढी आपल्या सांस्कृतिक ओळखीपासून दूर जात आहे.
ख्वाजा आसिफ यांनी इतिहासाच्या पुस्तकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू शासकांच्या इतिहासाला जवळपास संपवून टाकलं आहे. ते म्हणाले की, आम्ही चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांच्या इतिहासाची पुस्तके हटवली आहेत कारण ते हिंदू होते.'
ते पुढे म्हणाले, 'माझे पूर्वज हिंदू होते म्हणून मी काही कमी पाकिस्तानी होतो का? आसिफ यांच्या मते पाकिस्तानात शिकवली जाणारी पुस्तके अशा लोकांनी लिहिली आहेत ज्यांना येणारी पिढी एका खास मानसिकतेमध्ये तयार करायची आहे.
ख्वाजा आसिफ म्हणाले की, अमेरिकेच्या लढाईसाठी पाकिस्तानचा वापर करण्यासाठी समाजाचे विचार बदलण्यात आले. त्यांच्यासमोर तशाच प्रकारचा इतिहास समोर ठेवला. आमची मुले तथ्यात्मक इतिहास वाचत नाहीत. आज पाकिस्तानात अनेक लोकांना चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक कोण होते हे माहिती नाही.
ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे ज्यावेळी अमेरिका आणि इस्त्रायल वादाचा मुद्दा चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांना इब्राहम अकॉर्डमध्ये सामील होण्यास सांगितलं आहे. तसेच इस्त्रायलला मान्यता देण्याची अपील केली आहे.