pakistan is wasting 4 billion pkr every day without fighting a war
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात एक अशी रणनीती बनवली आहे की, युद्धाच्या आधिच पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. पै-पै साठी दुसऱ्यांच्या दारात जावे लागणाऱ्या पाकिस्तानचे रोज फक्त अलर्ट राहण्यासाठी आणि आपली सैन्य ताकदीचा दिखावा करण्यासाठी अब्जावधी रूपये उडवण्याची वेळ आलेली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान भारताने आर्थिक नाकेबंदी केल्याने एकिकडे पाकिस्तानला आर्थिक फटका बसला आहे, तर अशा परिस्थितीत युद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला ते परवडेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान तणाव वाढतच चाललेला आहे. याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. अणुहल्ल्याच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची तिजोरी युद्धापूर्वीच सतत रिकामी होत चालली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने कठोर कारवाई करून युद्धापूर्वी पाकिस्तानला थकवण्याची आणि दिवाळखोरी करण्याची रणनीती आखली आहे. सिंधू पाणी करार रद्द करण्यापासून ते व्यापार बंद करण्यापर्यंत, त्यावर आधीच पाणी बंद आणि आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या युद्धाच्या धमक्यांवर भारताने केलेला प्रत्युत्तर हल्ला आणि सीमेवर कडक तयारीमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.
भारताने आखलेल्या रणनितीचा परिणाम आता दिसू लागला आहे. आधीच पाकिस्तान आर्थिक संकटात असताना आता फक्त अलर्ट राहण्यासाठी रोज जवळपास ४ अब्ज पाकिस्तानी रूपये खर्ची घालावे लागत आहेत. सीमेवर सैनिकांची तैनाती, विमानांचे इंधन, सीमारेषेवरील साधनसामग्री पोहोचविण्यासाठी पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारला जवळपास ४ अब्ज पाकिस्तानी रूपये खर्च करावे लागत आहेत.
जर आपण पाकिस्तानच्या वार्षिक लष्करी बजेटबद्दल बोललो तर ते ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे २.१० लाख कोटी पाकिस्तानी रुपये) आहे, तर जर आपण भारतासोबतच्या तणावादरम्यान हाय अलर्टवरील खर्चाची गणना केली तर त्याचा अंदाजे मासिक खर्च ४०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ११,२५३ कोटी पाकिस्तानी रुपये) पर्यंत पोहोचू शकतो.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या या रणनितीला तज्ञ पाकिस्तानसाठी ही एक हळूवार मिळणारी शिक्षा असे म्हणतात. म्हणजेच आर्थिक आणि कूटनितीक जाळ्यात अडकवून विरोधकाला हळूहळू कमकुवत करणे होय. डिफेंस एक्सपर्ट बंसल यांचे म्हणणे आहे की, कंगाल पाकिस्तान कूटनितीक मंचावर एकटा पडत चालला आहे. इतकच नाही तर आर्थिक मंदीने ग्रासलेल्या पाकिस्तानने भारताला धमकी देण्यासाठी सुरू केलेला युद्धाभ्यासही आता बंद केला आहे.
भारताची लष्करी तयारी पाहून पाकिस्तानला सतत हल्ल्याची भीती वाटत आहे. यामुळे पाकिस्तान पूर्णपणे गोंधळलेला आहे आणि जगातील इतर देशांकडून मदत मागत आहे. पण चीनसारखा त्याचा मित्र देशही त्याला मदत करत नाहीये. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) या मुद्द्यावर बंद दाराआड बैठक बोलावली होती जेणेकरून ते आपल्या व्यथा सांगून इतर देशांची सहानुभूती मिळवू शकतील, परंतु तिथेही आपल्या या शेजारी देशाचा अपमान झाला.
भारताने जास्तीचा खर्च न करताच केवळ आपल्या राजनैतिक आणि धोरणात्मक निर्णयांनी पाकिस्तानला पराभूत करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबतच्या सर्व आयात-निर्यातीवर बंदी घातली. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी, पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास बंदी. यासह पाकिस्तानातील बिलावल भुट्टो आणि इमरान खान यांच्यासह पाकिस्तानी नेत्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. भारताने युद्धाच्या दिशेने एक पाऊलही उचललेले नसताना पाकिस्तानने स्वतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे अपील करण्याचे कारण हेच आहे.