Nepal flash floods File Photo
आंतरराष्ट्रीय

Nepal Flash Flood Compensation : "आम्हाला दान नको, नुकसानभरपाई द्या" ; महापुरानंतर नेपाळची भारत, अमेरिका अन् चीनकडे मागणी

जागतिक हवामान संकटाची मोठी किंमत नेपाळला मोजावी लागत असल्‍याचा परराष्ट्रमंत्री खनाल यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Nepal Climate Compensation India US China : हवामान बदलामुळे कोसळलेल्या भीषण महापुरात मोठे नुकसान झाल्यानंतर नेपाळने आता आक्रमक कूटनैतिक पाऊल उचलले आहे. हरितगृह वायूंचे (ग्रीनहाऊस गॅसेस) सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या भारत, अमेरिका आणि चीनसारख्या देशांकडून हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी नेपाळने राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत.

जागतिक हवामान संकटाची मोठी किंमत नेपाळला मोजावी लागत आहे

"आम्ही निर्माण न केलेल्या जागतिक हवामान संकटाची मोठी किंमत नेपाळला मोजावी लागत आहे," अशा शब्दांत नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी 'कांतीपूर टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत संताप व्यक्त केला. "नेपाळचे हरितगृह वायू उत्सर्जनातील योगदान नगण्य आहे; मात्र, हिमनद्यांचे झपाट्याने वितळणे आणि पर्वतीय भागांतील नैसर्गिक आपत्तींचा थेट फटका आमच्या देशाला बसत आहे. त्यामुळे आता आम्ही मदतीची किंवा दानाची याचना करत नसून, कायदेशीर आणि नैतिक हक्काची भरपाई मागत आहोत," असा इशारा त्यांनी दिला.

जागतिक व्यासपीठावर मुद्दा अत्यंत ठामपणे मांडणार

जागतिक मंचावर हा मुद्दा नेपाळ अत्यंत ठामपणे मांडणार असल्याचे स्पष्ट करत शिशिर खनाल यांनी भारत, चीन आणि अमेरिका यांनी नेपाळसारख्या संवेदनशील देशांची भरपाई करण्याची ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले. हिमनद्या वितळल्यास गंगा आणि त्रिशुलीसारख्या नद्यांवर अवलंबून असलेल्या दक्षिण आशियातील २ अब्जांहून अधिक लोकांच्या पाणीसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. भोटेकोशी नदीपात्रातील महापुरानंतर नेपाळने 'नुकसान आणि भरपाई निधी'कडे तातडीची आर्थिक मदत मागितली आहे.

'भारत आमच्यासाठी देवासारखा'

दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरातून वाचलेल्या नागरिकांसाठी शेजारील भारत देश मोठा पाठीराखा ठरला आहे. नुवाकोट येथील 'नेपाळ-भारत मैत्री भवन' (आयुर्वेद व पर्यायी रुग्णालय) सध्या अनेक बेघर पूरग्रस्तांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. २०१५ च्या भूकंपानंतर हे रुग्णालय भारतीय दूतावासाच्या आर्थिक मदतीने पुनरुज्जीवित करण्यात आले होते. रुग्णालय प्रमुख डॉ. नरेंद्र प्रसाद गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज १०० हून अधिक पूरग्रस्त या इमारतीत आश्रय घेत असून वैद्यकीय पथके उपचारासाठी तैनात आहेत. पुराच्या वेढ्यातून वाचलेल्या एका नागरिकाने, "भारत आमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली आणि देवासारखा आहे," अशा भावना व्यक्त करत भारतीय मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT