Elon Musk  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Musk vs Trump | इलॉन मस्क यांना रशियाची सूचक 'ऑफर'; डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादानंतर मोठी घडामोड

Musk vs Trump | अमेरिकेला उघडे पाडणाऱ्या स्नोडेनलाही रशियाने दिला आहे आश्रय; मस्क यांच्या कंपन्यांचे मुल्यांकन सुमारे 95 लाख कोटी रुपयांवर

Akshay Nirmale

Musk Trump feud Russia offers asylum to Elon Musk

नवी दिल्ली : टेस्ला व स्पेसएक्सचे संस्थापक आणि माजी DOGE प्रमुख इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. एकमेकांवर टीकाटिपण्णी, मस्क यांनी निवडणुकीत केलेली मदत आणि महाभियोगाचे वक्तव्य तर मस्क यांना दिलेली कंत्राटे रद्द करण्याबाबतचे ट्रम्प यांचे वक्तव्य यातून या दोन जागतिक स्तरावरील महत्वाच्या व्यक्तिमत्वांतील वाद अक्षरश: चव्हाट्यावर आला.

या पार्श्वभूमीवर रशियाकडून आता इलॉन मस्क यांच्यासाठी रेड कार्पेट अर्थात रशियात येण्यासाठी पायघड्या घालण्याबाबतचे संकेत मिळू लागले आहेत. रशियाच्या एका वरिष्ठ खासदाराने इलॉन मस्क यांना रशियामध्ये राजकीय आश्रय देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही खळबळ उडाली आहे.

जागतिक राजकारणात अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता नेहमीच एकमेकांच्या विरोधात राहिल्या आहेत. आणि एकमेकांना कमी लेखण्याची किंवा ताकद दाखविण्याची संधी दोन्ही देश सोडत नाहीत. त्यामुळेच रशियाच्या या पायघड्यांबाबत जागतिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

वादाची पार्श्वभूमी

मस्क यांनी ट्रम्प यांच्या "One Big Beautiful Bill" या अर्थसंकल्पीय विधेयकावर कठोर टीका केली होती. त्यांनी सांगितले की, हे विधेयक अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्जाचा डोंगर वाढवेल. त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर बेफिकीर खर्चाचा आरोप केला, तर ट्रम्प यांनी मस्कला "वेडा" असे संबोधले आणि त्यांच्याकडून सरकारी करार व सबसिडी काढून घेण्याची धमकी दिली.

DOGE प्रमुखपदाचा राजीनामा

गेल्या आठवड्यात मस्क यांनी "Department of Government Efficiency (DOGE)" या विवादास्पद फेडरल संस्थेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. ही संस्था सरकारी खर्चावर मर्यादा आणण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.

मात्र, आर्थिक धोरणांवरून व्हाईट हाऊसबरोबर सुरू असलेल्या संघर्षामुळे मस्क यांनी पद सोडले.

रशियाचा राजकीय आश्रयाचा संकेत

रशियन संसदेत (State Duma) आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे उपाध्यक्ष दिमित्री नोविकोव्ह यांनी TASS या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "जर एलन मस्क यांना आश्रय हवा असेल, तर रशिया नक्कीच तो देऊ शकतो."

मात्र त्यांनी असेही नमूद केले की, "मस्क एक वेगळा खेळ खेळत आहे. त्याला प्रत्यक्षात आश्रयाची गरज भासेल असे वाटत नाही."

क्रेमलिनची भूमिका स्पष्ट

रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. "ही अमेरिकेची देशांतर्गत बाब आहे. रशिया यामध्ये कोणतीही ढवळाढवळ करणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वीचे संदर्भ

तथापि, ही घटना काहीशी NSA च्या एडवर्ड स्नोडन यांना 2013 मध्ये रशियाकडून दिलेल्या आश्रयाची आठवण करून देते. तसेच ब्रिटिश ब्लॉग लेखक ग्राहम फिलिप्स यांनाही रशियाने आश्रय दिला होता.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

दरम्यान, ट्रम्प-मस्क या वादाचे पडसाद अमेरिकन शेअर बाजारातही उमटले. टेस्लाचे समभाग प्रचंड घसरले, तर मस्क यांनी अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण अवकाश प्रकल्पातून माघार घेण्याची धमकी दिल्याने सरकारी यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

मस्क यांनी राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग (Impeachment) आणण्याच्या हालचालींना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मस्क यांचे आर्थिक साम्राज्य

इलॉन मस्क यांचे आर्थिक साम्राज्य मोठे आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. टेस्ला, स्पेसएक्स, एक्स कॉर्प (ट्विटर), न्यूरालिंक, द बोरिंग कंपनी, एक्स एआय, सोलरसिटी, स्टारलिंक, टेस्ला एनर्जी, ग्रॉक एआय इत्यादी कंपन्या, उपकंपन्यांमध्ये ते कार्यरत आहेत.

एलन मस्क यांच्या या कंपन्यांचा एकत्रित आर्थिक डोलारा किंवा आर्थिक उलाढाल मोठी आहे. यातील काही कंपन्या खासगी आहेत (जसे SpaceX, Neuralink) त्यामुळे त्यांची अचूक आर्थिक माहिती सार्वजनिक नसते. तरीही, 2025 पर्यंतच्या उपलब्ध अंदाजांवर त्याचे चित्र मिळू शकते.

Tesla ची 2024 मधील उलाढाल 110 अब्ज डॉलर इतकी आहे. स्पेसएक्सची 12 अब्ज डॉलर आहे. यात स्टारलिंकचाही समावेश आहे. एक्स कॉर्पची उलाढाल 3 ते 4 अब्ज डॉलर इतकी आहे. द बोरिंग कंपनीची उलाढाल 100 ते 300 दशलक्ष डॉलर इतकी आहे. सोलरसिटीची उलाढाल 6 ते 8 अब्ज डॉलर इतकी आहे.

एकंदरीत मस्क यांच्या एकूण सर्व कंपन्यांचे मुल्यांकन सुमारे 850 ते 950 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 85 ते 95 लाख कोटी रुपये इतके आहे. तर त्यातील एकत्रित महसूल सुमारे 130 ते 140 अब्ज डॉलर इतका आहे.

Tesla ही मस्क यांची सर्वात मोठी आणि सार्वजनिक कंपनी आहे. तिचे मार्केट व्हॅल्युएशन इतर कोणत्याही मस्कच्या कंपनीपेक्षा खूप जास्त आहे. SpaceX खासगी असूनही ती जगातील सर्वात मूल्यवान खासगी कंपन्यांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT