Fraud Marshal | फ्रॉड मार्शल... लूजर... लायर..! पाकिस्तानी नागरिकांनीच न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेयरवर काढले लष्करप्रमुख मुनीरचे वाभाडे
Fraud Marshal Asim Munir
न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर अलीकडेच झळकलेल्या एका डिजिटल बिलबोर्डने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल जनरल असीम मुनीर यांना जागतिक स्तरावर चर्चेचा आणि टीकेचा विषय बनवले आहे. 'Fraud Marshal', 'Liar' आणि 'The Deceiver' असे जोरदार शब्द वापरून जनरल मुनीरसह पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही तीव्र निशाणा साधण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही मोहीम अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी चालवली असून, त्यामागे देशातील लष्करी हस्तक्षेप, राजकीय अराजकता आणि इम्रान खान यांच्या अटकेविरोधातील संताप आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक माध्यमांमध्येही चर्चिला जात आहे. त्यामुळे ‘फ्रॉड मार्शल’ ही टीका ट्रेंडिंगमध्ये आली आहे. यातून केवळ उपरोधच नव्हे तर पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवरील अविश्वास आणि विरोध जगासमोर आला आहे.
भारताविरूद्ध पराभवानंतरही पदोन्नती
अलीकडेच, भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या लष्करी संघर्षानंतर पाक लष्कराचे मोठे नुकसान झाले होते. 6-7 मे 2025 रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि टीआरएफ सारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले गेले. 10 मे रोजी तडजोडीची भूमिका घेत पाकिस्तानने युद्धविरामाची भूमिका घेतली.
पण या पराभवानंतरही पाकचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना 'फिल्ड मार्शल' ही पाकिस्तानमधील सर्वाधिक सन्मानाची, पण प्रातिनिधिक पदवी दिली गेली.
यामुळे पाकिस्तानातीलच नव्हे, तर परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांमध्येही संताप निर्माण झाला आहे. अनेकांनी याला "अपयशासाठी सन्मान" असे म्हणत टीका केली.
टाईम्स स्क्वेयरवरील बिलबोर्डवर काय म्हटले आहे?
न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर एका ट्रकवर फिरणाऱ्या डिजिटल स्क्रीनवर खालील मुद्दे झळकले:
THE DECEIVER & HIS TWO CROOKS – असीम मुनीर, झरदारी आणि नवाज शरीफ यांचे फोटो.
ILLEGALLY DETAINED FOR 2 YEARS – माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगातील फोटो.
FRAUD MARSHAL, LIAR – WHY DON’T YOU TAKE A POLL?
GOOD WORK MAKES YOU STAND TALL, NOT FAKE TITLES
REAL HERO STANDING WITH IMRAN KHAN
इम्रान खान- मुनीर संघर्ष
इम्रान खान यांची 2023 पासूनची अटकेत असलेली अवस्था आणि त्यांच्यावर लागलेले आरोप (भ्रष्टाचार, सरकारी वस्तूंचा गैरवापर, गोपनीय माहिती फोडणे) हेच पाक राजकारणातील मुख्य वादग्रस्त मुद्दे बनले आहेत. त्यांच्या समर्थकांनी ही कारवाई लष्करी सत्तेचा गैरवापर म्हणून पाहिली आहे.
असीम मुनीर यांच्याशी इम्रान यांचा संघर्ष ते पंतप्रधान असताना सुरु झाला होता. तेव्हा मुनीर ISI प्रमुख होते. नंतर त्यांना या पदावरून हटवले गेले होते. तेव्हा मुनीर यांनी इम्रान यांची पत्नी बुशरा बिबी कडून प्रयत्न चालवले होते. मात्र त्यांनीही मुनीरला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
परदेशी पाकिस्तानी समुदायाची भूमिका
जगभर पसरलेले पाकिस्तानी नागरिक, विशेषतः अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील पाकिस्तानी सोशल मीडियावर सक्रिय असून ते इम्रान खान यांना न्याय मिळावा यासाठी अनेक प्रकारे आंदोलन करत आहेत. टाईम्स स्क्वेअरवरील ही मोहीम त्यांच्या रोषाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिध्वनी करणारे पाऊल ठरत आहे.
असीम मुनीर, नवाज शरीफ आणि झरदारी या तिघांना "तीन भ्रष्ट राजकीय साठे" असे संबोधून, ही मंडळी स्वतःच्या हितासाठी देश विकण्यास तयार असल्याचा आरोप या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे.
असीम मुनीर यांच्यावरचे टीकेचे सत्र आता केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित राहिले नसून आंतरराष्ट्रीय मंचांवरही पोहोचले आहे. ही संपूर्ण घटना पाकिस्तानच्या लष्कर आणि राजकारणात सध्या सुरू असलेल्या असंतोषाचे प्रतिक आहे. परदेशी पाकिस्तानी समुदायाच्या या कृतीमुळे पाकिस्तानी नेतृत्वाच्या जागतिक प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

