Global Flight Cancellations Pudhari
आंतरराष्ट्रीय

Global Flight Cancellations: मध्यपूर्वेतील युद्धाचा जागतिक हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम; हजारो उड्डाणे रद्द

अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर 4,000 हून अधिक उड्डाणांवर परिणाम; एमिरेट्स, एअर इंडिया, ब्रिटिश एअरवेजसह प्रमुख विमान कंपन्यांची सेवा स्थगित

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या सेवा विमान कंपन्यांनी स्थगित केल्यामुळे कोव्हिड साथीनंतर जागतिक हवाई वाहतुकीतील सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला असून हजारो उड्डाणे उशिरा झाली किंवा रद्द करण्यात आली आहेत.

शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर आणि इराणने संपन्न आखाती प्रदेशातील राजधानी शहरांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इराण, इराक, इस्रायल, सीरिया, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी किमान अंशतः आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली.

मध्य पूर्व, युरोप, आशिया-पॅसिफिक आणि अमेरिकेतील प्रमुख विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत. सेवा रद्द करणाऱ्या प्रमुख विमान कंपन्यांमध्ये एमिरेटस्‌‍, एतिहाद, एअर फ्रान्स, ब्रिटिश एअरवेज, एअर इंडिया, तुर्किश एअरलाइन्स आणि लुफ्तान्सा यांचा समावेश आहे. शनिवारी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये उतरण्यासाठी नियोजित सुमारे 4,218 उड्डाणांपैकी 966 (22.9 टक्के) उड्डाणे रद्द करण्यात आली. परतीची उड्डाणे धरल्यास हा आकडा 1,800 पेक्षा जास्त आहे. रविवारी मध्य पूर्वेकडे नियोजित 4,329 उड्डाणांपैकी 716 उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचे सीरियमने सांगितले. फ्लाईट ट्रॅकिंग संकेतस्थळ फ्लाईटअवेयरने रविवारी जीएमटी वेळेनुसार 2.30 पर्यंत जगभरातील 19,000 हून अधिक उड्डाणे उशिरा झाली.

युरोपीय विमान कंपन्या

रशियाच्या हवाई वाहतूक प्राधिकरण रोसावियात्सियाने इस्रायल आणि इराणकडे जाणारी सर्व व्यावसायिक उड्डाणे ‌‘पुढील सूचना येईपर्यंत‌’ रद्द केल्याचे सांगितले.

तुर्किश एअरलाइन्सने लेबनॉन, सिरिया, इराक, इराण आणि जॉर्डनकडे जाणारी उड्डाणे 2 मार्चपर्यंत रद्द केली.

एअर फ्रान्सने शनिवारी दुबई, रियाध आणि बेरुतकडे जाणारी उड्डाणे रद्द केली आणि तेल अवीवकडे जाणारी उड्डाणे रविवारपर्यंत स्थगित केली.

ब्रिटिश एअरवेजने 4 मार्चपर्यंत तेल अवीव आणि बहरीनकडे उड्डाणे न करण्याचे सांगितले तसेच शनिवारी अम्मानकडे जाणारी उड्डाणे रद्द केली.

स्विस इंटरनॅशनल एअर लाइन्सने 7 मार्चपर्यंत तेल अवीवकडे ये-जा करणारी उड्डाणे स्थगित केली, शनिवारी व रविवारी झ्युरिखहून दुबईकडे जाणारी उड्डाणे रद्द केली.

जर्मनीची लुफ्तान्सा (ज्यात स्विस आणि आयटीए एअरवेजचा समावेश आहे) यांनी 7 मार्चपर्यंत तेल अवीव, बेरुत, अम्मान, एरबिल आणि तेहरानकडे ये-जा करणारी उड्डाणे रद्द केली. दुबई आणि अबू धाबीची उड्डाणे स्थगित केली.

उत्तर अमेरिकन विमान कंपन्या

डेल्टा एअर लाइन्सने न्यूयॉर्क तेल अवीव उड्डाणे रविवारपर्यंत स्थगित केली.

अमेरिकन एअरलाइन्सने दोहाफिलाडेल्फिया उड्डाणे ‌‘तात्पुरती स्थगित‌’ केली.

युनायटेड एअरलाइन्सची तेल अवीवकडे जाणारी उड्डाणे सोमवारीपर्यंत आणि दुबईकडे जाणारी उड्डाणे रविवारीपर्यंत रद्द करण्यात आली.

एअर कॅनडाने कॅनडाहून इस्रायलला जाणारी उड्डाणे 8 मार्चपर्यंत आणि दुबईकडे जाणारी उड्डाणे 3 मार्चपर्यंत रद्द केल्याचे सांगितले.

आशिया-पॅसिफिक विमान कंपन्या

भारताच्या दोन सर्वात मोठ्या खासगी विमान कंपन्या इंडिगो आणि एअर इंडियाने मध्य पूर्वेकडील सर्व गंतव्यस्थळांकडे जाणारी उड्डाणे स्थगित केली.

इराणच्या सीमेलगत असलेल्या पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने यूएई, बहरीन, दोहा आणि कुवेतकडे जाणारी उड्डाणे स्थगित केली.

हाँगकाँगची कॅथे पॅसिफिकने दुबई आणि रियाधकडे जाणारी उड्डाणे स्थगित केली.

इंडोनेशियाची राष्ट्रीय विमान कंपनी गरुडा इंडोनेशियाने दोहाकडे ये-जा करणारी उड्डाणे ‌‘पुढील सूचना येईपर्यंत‌’ तात्पुरती स्थगित केली.

सिंगापूर एअरलाइन्स आणि सिंगापूरची स्कूट यांनी रविवारअखेरपर्यंत या प्रदेशातील सहा मार्गांवरील उड्डाणे रद्द केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT