Jeffrey Epstein  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Jeffrey Epstein : १७ तरुणी, रशियन उद्योगपती अन् पुतिन यांच्‍यापर्यंत पोहोचण्याची धडपड : 'एपस्टीन'चा रशियातला 'डाव' आला समोर

Jeffrey Epstein Russia investigation: दोषसिद्धीनंतरही स्वतःला वाचवण्यासाठी केवीलवाणी धडपड केल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Jeffrey Epstein Russia investigation: लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेला जेफ्री एपस्टीन, २००८ मधील आपल्या दोषसिद्धीनंतर जागतिक उच्चभ्रू वर्तुळात आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याने रशिया आणि इतर माजी सोव्हिएत देशांतील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू ठेवले, तसेच तिथल्या श्रीमंत उद्योगपतींशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित केले होते. रशिया आणि इतर माजी सोव्हिएत देशांतील किमान १७ तरुणींना या मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढले गेले होते, असे एका तपासात समोर आले आहे. एपस्टीनच्या रशियन संबंधांची माहिती असलेल्या दोन डझनहून अधिक व्यक्तींच्या मुलाखती आणि शेकडो पानांच्या कागदपत्रांची पडताळणीनंतर वृत्तसंस्‍था 'रॉयटर्स'ने हा रिर्पाट प्रसिद्ध केला आहे.

मॉडेलिंग क्षेत्रातून झाली सुरुवात

एपस्टीनचे रशियन कनेक्‍शन मॉडेलिंग उद्योगातून सुरु झाले. १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर मॉडेलिंग एजंट्स नवीन चेहऱ्यांच्या शोधात या भागात फिरत होते. एपस्टीनसोबत काम करणारा फ्रेंच एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल याने पूर्व युरोपातून तरुणींची भरती करून त्यांना पॅरिस आणि अमेरिकेत आणले, असे या रिपोर्टमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

पाहता हा प्रकार अत्यंत विचित्र होता...

माजी मॉडेल थायसिया हुइसमन हिने सप्टेंबर १९९१ मध्ये पॅरिसमध्ये ब्रुनेलने आयोजित केलेल्या एका पार्टीत एपस्टीनला भेटल्याची आठवण सांगितली. या पार्टीत वयाने अगदीच लहान वाटणारी एक रशियन मुलगी बराच वेळ एपस्टीनच्या मांडीवर बसली होती. "मॉडेलिंगचे काम चांगले नसले तरी 'जेफ्री माझी काळजी घेतो', असे त्या मुलीने सांगितले होते. तिचे कमी वय पाहता हा प्रकार अत्यंत विचित्र होता," असे हुइसमन हिने सांगितले. मात्र, या पार्टीची किंवा त्या मुलीच्या वयाची व ओळखीची स्वतंत्रपणे पुष्टी करता आली नसल्याचे 'रॉयटर्स'ने स्पष्ट केले आहे.

रशियाचे दोन दौरे आणि उच्चभ्रूंशी जवळीक

एपस्टीनने १९९८ आणि २००२ असे दोन वेळा रशियाचे दौरे केले. पहिल्या दौऱ्यात तो सोव्हिएत युनियनच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या 'सारोव' या प्रतिबंधित शहरात गेला होता. २००२ मधील दुसऱ्या दौऱ्यात त्याने ब्रुनेल आणि गिस्लेन मॅक्सवेल यांच्यासोबत मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गला भेट दिली होती.

दोषसिद्धीनंतरही स्वतःला वाचवण्यासाठी एक केवीलवाणी धडपड

२००८ मध्ये फ्लोरिडा न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर एपस्टीनने १३ महिने तुरुंगवास भोगला. यानंतर त्याने रशियन उच्चभ्रूंशी संबंध वाढवण्यावर अधिक भर दिला. यामध्ये रशियन रिअल इस्टेट व्यावसायिक व्लादिस्लाव डोरोनिन आणि माजी उपअर्थमंत्री सेर्गेई बेलियाकोव्ह यांचा समावेश होता. रशियाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एपस्टीनने बेलियाकोव्ह यांचा एक माध्यम म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे ईमेलमधून समोर आले आहे.

पुतिन यांच्या भेटीचे प्रयत्न निष्फळ

एप्रिल २०१५ मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये एपस्टीनने लिहिले होते की, "तुम्ही बेलियाकोव्ह यांना एक संदेश पाठवावा. बाजारपेठ, चलन आणि आर्थिक व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी जेफ्रीसोबत थोडा वेळ घालवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या सल्लागारांना त्याचा फायदा होईल." मात्र, एपस्टीनने कधीही पुतिन यांची भेट घेतल्याचा, रशियन गुप्तचर यंत्रणेसाठी काम केल्याचा किंवा रशियन सरकारच्या वतीने कोणतीही भूमिका बजावल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. २०११ मध्ये पुतिन यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न अखेर सोडून देण्यात आला होता.

मॉडेलिंग एजन्सीद्वारे तरुणींची पिळवणूक

मॉडेलिंग एजन्सीच्या माध्यमातूनही एपस्टीनने रशियात आपले जाळे विणले होते. ब्रुनेलच्या मियामी येथील 'एमसी२ मॉडेल्स मॅनेजमेंट' या एजन्सीने रशियातून मोठ्या प्रमाणावर तरुणींची भरती केली, तर एपस्टीनने काही मॉडेल्सच्या राहण्याची व्यवस्था केली. एपस्टीनने आपले लैंगिक शोषण केले आणि आर्थिक तसेच इमिग्रेशनच्या मुद्द्यांवरून आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडले, असा आरोप माजी मॉडेल स्वेतलाना पोझिडेवा हिने केला आहे.अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि तस्करीच्या आरोपांखाली खटला सुरू असतानाच २०१९ मध्ये मॅनहॅटन येथील तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला. रशियामध्ये प्रभाव निर्माण करण्याच्या त्याच्या प्रयत्नांतून कोणताही मोठा व्यावसायिक करार झाला नाही किंवा पुतिन यांच्यापर्यंत त्याला पोहोचता आले नाही. असे असले तरी, त्याच्या तस्करीच्या जाळ्याचा आणि त्याच्या वर्तुळातील प्रभावशाली व्यक्तींचा तपास अद्याप सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT