Jeffrey Epstein case | भांडवलशाहीचा विद्रूप चेहरा

Jeffrey Epstein case
Jeffrey Epstein case | भांडवलशाहीचा विद्रूप चेहरा
Published on
Updated on

डॉ. जयदेवी पवार

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचा आरोप असलेल्या जेफ्री एपस्टीनच्या प्रकरणाने संपूर्ण अमेरिकेत आणि जगात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीनशी संबंधित तब्बल 30 लाख नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत.

सत्ता, अफाट संपत्ती आणि विकृत वासना यांचा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा समाजातील तथाकथित ‘व्हाईट कॉलर’ उच्चभ्रूवर्गाच्या उथळ नैतिकतेच्या ठिकर्‍या उडाल्याशिवाय राहत नाहीत. अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन नावाच्या वादळाने सध्या जागतिक राजकारण आणि समाजकारणात जे काहूर माजवले आहे, ते केवळ एका गुन्हेगाराच्या कृत्यांचा पाढा वाचणारे नसून, आधुनिक भांडवलशाहीच्या काळोख्या कोपर्‍यात दडलेल्या विकृतीचे दर्शन घडवणारे आहे. ‘एपस्टीन फाईल्स’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या हजारो पानांच्या कागदपत्रांनी जगासमोर एक असा आरसा धरला आहे, ज्यात लोकशाहीचे कैवारी म्हणवून घेणार्‍या धुरिणांचे खरे आणि विद्रूप चेहरे स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

जेफ्री एपस्टीन हा जागतिक सत्ताकेंद्रांच्या वर्तुळात वावरणारा एक असा मध्यस्थ होता, ज्याने आपल्या अफाट संपत्तीच्या जोरावर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींना आपल्या कह्यात ठेवले होते. न्यूयॉर्कमधील आलिशान वाडे असोत किंवा कॅरेबियन समुद्रातील त्याचे लिटिल सेंट जेम्स हे खासगी बेट असो, एपस्टीनने अय्याशीचे असे एक समांतर साम्राज्य उभे केले होते, जिथे कायद्याचे हात कधीच पोहोचू शकत नव्हते. त्याच्या या साम्राज्यात राजकारणी, शास्त्रज्ञ, राजघराण्यातील व्यक्ती आणि उद्योगपतींचा राबता होता. मात्र, या चकाकीच्या मागे होता तो स्त्रियांचा आणि प्रामुख्याने अल्पवयीन मुलींचा केला जाणारा अमानवी वापर.

‘एपस्टीन फाईल्स’मधील नावांची यादी ही यासंदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या एका जुन्या खटल्याचा भाग आहे. व्हर्जिनिया जुफ्रे नावाच्या महिलेने एपस्टीनची सहकारी घिसलेन मॅक्सवेल हिच्यावर केलेल्या मानहानीच्या दाव्यादरम्यान ही कागदपत्रे गोळा करण्यात आली होती. यामध्ये साक्षीदारांचे जबाब, विमानाचे लॉग बुक्स आणि एपस्टीनच्या बेटावर कोणाकोणाची ये-जा होती, याचे तपशील आहेत. आताच ही कागदपत्रे उघड होण्यामागे अमेरिकेतील न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आणि गोपनीयतेच्या पडद्यानंतर, न्यायालयाने जनहितासाठी ही नावे उघड करण्याचा आदेश दिला आहे. यामुळेच आज अनेकांचे धाबे दणाणले आहे. या कागदपत्रांमध्ये उमटलेली नावे पाहिली तर कोणाचेही डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू, ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि गुगलसारख्या बड्या कंपन्यांशी संबंधित व्यक्तींची नावे या फाईल्समध्ये कोणत्या ना कोणत्या संदर्भात आली आहेत. कोण तिथे केवळ पाहुणा म्हणून गेले होते की कोण शोषणात सहभागी होते, याचा तपास आता होईलच; परंतु या व्यक्तींचा एपस्टीनसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाशी असलेला घनिष्ठ संबंधच मुळात संशयास्पद आणि निषेधार्ह आहे.

या प्रकरणातून भांडवली अर्थकारणाची जी काळी बाजू समोर येते, ती अधिक भयावह आहे. ज्या जगात पैसा हेच सर्वस्व मानले जाते, तिथे नैतिकतेचे मूल्य शून्यावर येते. एपस्टीनने आपल्या संपत्तीचा वापर करून एक अशी व्यवस्था निर्माण केली होती, जिथे तो गरिबीने पिचलेल्या मुलींना पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत असे. मानवी शरीराला केवळ एक उपभोग्य वस्तू मानणे, हे भांडवलशाहीचे क्रूर स्वरूप आहे. आलिशान विमाने, खासगी बेटे आणि पंचतारांकित सोयीसुविधांच्या आड महिलांची तस्करी आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे हे जे केंद्र बनले होते, ते आधुनिक जगाच्या प्रगतीवरचा काळाकुट्ट डाग आहे.

मुख्यत्वेकरून स्त्रियांचा या व्यवस्थेत केला जाणारा वापर हा या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात वेदनादायी भाग आहे. एपस्टीनने स्त्रियांना केवळ वासनापूर्तीचे साधनच बनवले नाही, तर आपल्या राजकीय आणि व्यावसायिक हितसंबंधांसाठी त्यांचा वापर एखाद्या चलनासारखा केला. मोठ्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याने या मुलींचा वापर केला, जेणेकरून भविष्यात या व्यक्तींना ब्लॅकमेल करता येईल किंवा त्यांच्याकडून कामे करून घेता येतील. हे आधुनिक काळातील गुलामगिरीचेच रूप आहे. ज्या स्त्रियांचे शोषण झाले, त्यापैकी अनेकजणी आजही त्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणार्‍या पुरुषांनी या स्त्रियांच्या किंकाळ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या सुखाचा विचार केला, ही मानवी संस्कृतीची अधोगती आहे.

भांडवलशाही जेव्हा नीतिमत्ता सोडून धावू लागते, तेव्हा ती अशाच प्रकारच्या एपस्टीनना जन्म देते. सत्तेच्या शिखरावर असलेल्या लोकांना आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असे वाटू लागते. एपस्टीनने 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या केली; परंतु त्याच्या मृत्यूसोबतच अनेक रहस्ये कायमची दडपली जातील, असे वाटत असतानाच या फाईल्स उघड झाल्या आहेत. ही नावे समोर येणे म्हणजे केवळ संताप व्यक्त करण्याची वेळ नसून, ती आपल्या व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्याची गरज व्यक्त करणारी घटना आहे. जेफ्री एपस्टीनसारखी माणसे समाजात एका रात्रीत मोठी होत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news