Israel intellegence Arabic Islamic studies
जेरुसलेम : इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाने (IDF Intelligence Directorate – AMAN) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे सर्व गुप्तचर सैनिक आणि अधिकाऱ्यांना अरबी भाषा आणि इस्लाम धर्माविषयीचे शिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही योजना ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या गुप्तचर अपयशानंतर सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून अंमलात आणण्यात येत आहे.
गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल श्लोमी बिंदर यांच्या नेतृत्वाखाली हे सुधारणा अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत, इस्लाम धर्माविषयी खोल समज निर्माण करणे आणि अरबी भाषेतील प्राविण्य मिळवणे हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
विशेषतः हुती (Houthi) आणि इराकी (Iraqi) बोलीभाषा समजून घेण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
100 टक्के गुप्तचर कर्मचाऱ्यांना इस्लाम धर्माचे प्रशिक्षण दिले जाईल.
50 टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल.
तांत्रिक विभागातील, अगदी सायबर 8200 युनिटधील अधिकारी आणि सैनिकांनाही हे प्रशिक्षण घ्यावे लागेल.
नवीन अभ्यासक्रमांत स्थानिक प्रशिक्षक सहभागी असतील जे हुती व इराकी बोलींमधील सूक्ष्म फरक समजावून सांगतील.
आर्मी रेडिओचे लष्करी वार्ताहर डोरोन कादोश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी आणि इस्लामिक अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला जाणार आहे. याशिवाय, याआधी बंद करण्यात आलेला TELEM विभाग – जो इतर शाळांमध्ये अरबी व मध्य-पूर्व शिक्षण प्रसारासाठी होता – त्याचा पुनरारंभ केला जाणार आहे.
हुती गटाच्या संप्रेषण पद्धती समजून घेण्यात इस्रायलच्या गुप्तचर कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. यामागे एक कारण म्हणजे येमेनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खात (khat) या वनस्पतीचा प्रभाव.
खात ही वनस्पती चघळल्यामुळे बोली अस्पष्ट होते आणि संवाद समजणे कठीण होते. यामुळेच जून महिन्यात हुती नेत्यावरचा एक हल्ला अयशस्वी ठरल्याचे समजते.
एका वरिष्ठ AMAN अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “आतापर्यंत आपण भाषा, संस्कृती आणि इस्लामविषयी फारसे लक्ष दिले नाही. पण हे बदलणे आवश्यक आहेत.
इस्रायलचे सैनिक अरब गावांमधील स्थानिक बनावेत अशी आमची अपेक्षा नाही, पण त्यांना आवश्यक ती संस्कृती आणि भाषेची समज असणे गरजेचे आहे. यामुळे त्यांचे निरीक्षण अधिक प्रभावी होईल.”
एकंदरीत लष्करी ताकदीबरोबरच सांस्कृतिक आणि भाषिक समज ही आता गुप्तचर यंत्रणेची आवश्यक गोष्ट बनली आहे.