Israel Iran nuclear tensions Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran-Israel War : ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इराणने डागली क्षेपणास्त्रे, इस्रायलमध्ये चार ठार

बेअरशेबा शहरातील इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळले, अनेक जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी केलेल्‍या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणने आज (दि. २४) इस्रायलवर ६ वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. 'टाईम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, बेअरशेबा शहरातील इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळले. वैद्यकीय विभागाने म्‍हटलं आहे की, इराणने आज केलेल्‍या क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

इस्रायल आणि इराणमध्ये १२ तास युद्धबंदी : ट्रम्‍प यांचा दावा

इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पहाटे ३:३० वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्‍ट करत केला. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिलं की, "मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इस्रायल आणि इराणमध्ये १२ तासांत म्हणजेच आतापासून ६ तासांत पूर्ण युद्धबंदी लागू होईल. इराण पहिल्या १२ तासांसाठी शस्त्रे ठेवेल आणि त्यानंतर पुढील १२ तासांसाठी इस्रायल शस्त्रे ठेवेल. मात्र यानंतर काही वेळातच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायलशी युद्धबंदीच्या वृत्तांना नकार दिला. ते म्‍हणाले की, इस्रायलशी अद्याप कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही. जर इस्रायल हल्ले थांबवले तर इराणही हल्ला करणार नाही.

इराणने इस्रायलवर पुन्‍हा एकदा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे

इस्रायली सैन्याच्या मते, इराणने आज ६ वेळा बॅलिस्‍टि क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये एकूण १५ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, इराणच्या दिशेने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या हल्ल्यात डागण्यात आलेले क्षेपणास्त्रे अद्याप इस्रायलपर्यंत पोहोचलेले नाहीत. कान न्यूजच्या वृत्तानुसार, इराणने आतापर्यंत ११ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.

ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब टाकणाऱ्या वैमानिकांचे केले कौतुक

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करणाऱ्या बी२ बॉम्बर वैमानिकांचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले - आमच्या हुशार बी-२ वैमानिकांच्या प्रतिभा आणि शौर्याशिवाय आज आपण हा करार करू शकलो नसतो. संध्याकाळी उशिरा झालेल्या अचूक हल्ल्याने सर्वांना एकत्र आणले आणि करार झाला. तथापि, अमेरिकन न्यूज वेबसाइट ओपन सोर्स इंटेलने दावा केला की, ट्रम्पच्या घोषणेनुसार पुढील ५ मिनिटांत युद्धबंदी लागू केली जाणार आहे. परंतु आधीच डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे कदाचित युद्धबंदीनंतर पडतील.

इस्रायल आणि इराण शांततेसाठी माझ्याकडे आले: ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्‍हटले आहे की, इस्रायल आणि इराण जवळजवळ एकाच वेळी माझ्याकडे आले आणि म्हणाले की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मला माहित होते की आता वेळ आली आहे. जग आणि मध्य पूर्व हे खरे विजेते आहेत. दोन्ही राष्ट्रे त्यांच्या भविष्यात प्रचंड प्रेम, शांती आणि समृद्धी पाहतील. त्यांना खूप काही साध्य करायचे आहे. जर ते धर्म आणि सत्याच्या मार्गापासून दूर गेले तर त्यांना खूप काही गमवावे लागेल, असा इशाराही ट्रम्‍प यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT