Khamenei Indian roots Ayatollah ali Khamenei ancestry Khamenei family origin Iran India connection Kintoor village Barabanki Uttar Pradesh
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील इराण विरूद्ध इस्रायल यांच्यात काही दिवसांपुर्वी नव्याने संघर्ष सुरू झाल्यानंतर अमेरिकेने नुकतेच इराणवर मोठा एअरस्ट्राईक केला आणि तेथील अणु केंद्रे उद्धवस्त केल्याचा दावा केला.
गेल्या काही दिवसांत या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेसमोर न झुकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
अलीकडच्या काळात तसेच यापुर्वीही अयातुल्ला अली खामेनेई हे नाव सतत चर्चेत राहिले आहे. अनेकांना माहिती नसेल पण या अयातुल्ला खामेनेई यांचे मूळ भारतातील आहे. भारतातील एका गावात खामेनेई यांचे पूर्वज वास्तव्यास होते. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
अयातुल्ला रुहोल्ला मुसावी खोमेनी (Khomeini) हे इराणमधील इस्लामी क्रांतीचे नेते आणि तेथील पहिले सर्वोच्च नेते होते. त्यांनी 1979 मध्ये इराणमधील शाह रझा पहलवी यांची राजवट उलथवून टाकली आणि इराणमध्ये इस्लामी प्रजासत्ताक स्थापन केले.
1989 मध्ये त्यांचे निधन झाले. इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांचा कार्यकाळ 1979 ते 1989 असा आहे. खोमेनी (Khomeini) या आडनावाचा उच्चा "खो-मे-नी" असा केला जातो.
खोमेनी हे शिया मुसलमान पंथातील एक उच्च दर्जाचे धर्मगुरु (Grand Ayatollah) होते. त्यांनी "विलायत-ए-फकिह" (Islamic Jurist’s Rule) ही संकल्पना मांडून धर्मगुरूंना राजकीय सत्ता देण्याचे तत्त्व मांडले. 3 जून 1989 रोजी अयातुल्ला खोमेनी यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर अयातुल्ला अली खामेनेई यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. खोमेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणमध्ये त्यांना आध्यात्मिक आणि राष्ट्रीय नेते म्हणून मानले जाते.
अयातुल्ला अली खामेनेई (Khamenei) हे आधीच्या अयातुल्ला रुहोल्ला मुसावी खोमेनी यांचे उत्तराधिकारी आणि सध्याचे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. ते 1989 पासून आजपर्यंत इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचे पूर्ण नाव सय्यीद अली होसैनी खामेनेई असे आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांचा इराणचे सर्वोच्च नेते म्हणून कार्यकाळ 1989 ते आजतागायत आहे. खामेनेई (Khamenei) या आडनावाचा उच्चार "खा-मे-ने-ई" असाच केला जातो.
अयातुल्ला खोमेनी किंवा अयातुल्ला खामेनी/खामेनेई असे उच्चारले की अनेकांना या एकच व्यक्ती वाटतात. पण या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. त्यामुळेच खोमेनी आणि खामेनेई ही दोन्ही नावे बरोबर आहेत.
थोडक्यात जर इराणमधील 1979 च्या क्रांतीविषयी बोलत असू तर "खोमेनी" योग्य, आणि सध्याच्या इराणच्या नेतृत्वाविषयी बोलत असू तर "खामेनेई" वापरणे बरोबर ठरेल.
1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीचे नेतृत्व करणारे अयातुल्ला रुहोल्ला मुसावी खोमेनी हे इराणचे पहिले सर्वोच्च नेते ठरले. त्यांचे आजोबा, सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म 19व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्याजवळील किंतूर या छोट्याशा गावात झाला होता. किंतूर हे गाव शिया इस्लामी शिक्षणाचे केंद्र मानले जाते.
खोमेनी यांचे कुटुंब "सैयद" वंशाचे होते, म्हणजेच त्यांचे पूर्वज थेट इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वंशातले मानले जातात. अशा सैयद घराण्यांना समाजात धार्मिक प्रतिष्ठा आणि शैक्षणिक नेतृत्वाचे स्थान प्राप्त असे. सय्यद अहमद मुसावी हे शिया धर्मप्रसार, शिक्षण आणि इस्लामी शास्त्रांमध्ये निपुण होते. ते भारतात धर्मोपदेशक व धर्मगुरु म्हणून कार्यरत होते.
पुढे धार्मिक शिक्षणासाठी आणि शिया धर्माच्या पवित्र स्थळांजवळ राहण्यासाठी सय्यद अहमद मुसावी यांनी भारतातून नजाफ (इराक) येथे स्थलांतर केले. काही वर्षांनंतर ते इराणमधील खोमेइन (Khomein) शहरात 1834 साली स्थायिक झाले.
ह्याच गावावरून पुढे त्यांचे वंशज "खोमेनी" हे टोपणनाव वापरू लागले. भारतातून गेलेल्या सय्यद अहमद मुसावी यांनी "हिंदी" ही उपाधी कायम ठेवली. अयातुल्ला खोमेनी यांच्या इराणी कागदपत्रांमध्येही त्यांच्या वडिलांचा उल्लेख "मुसावी Hindi" असा सापडतो, जो त्यांच्या भारतीय मूळाचे प्रमाण आहे.
सय्यद अहमद मुसावी यांच्यामुळेच अयातुल्ला खाेमेनी यांच्यात अध्यात्मिकतेची बीजे रोवली गेली असे मानले जाते. पुढे जाऊन त्यांनी इराणमधील राजकीय इतिहासच बदलून टाकला.
खोमेनी यांनी सत्ता मिळवल्यानंतरही त्यांच्यातील साधेपणा तसाच होता. ते तेहरानमधील एका साध्या, एकमजली घरात राहत होते. हे घर त्यांना सय्यद महदी इमाम जमाह यांनी मोफत देऊ केले होते, तरीही त्यांनी त्यासाठी हजार रियाल दिले. या घरात दोन लहान खोल्या होत्या आणि नंतर त्याला एक छोटा हॉल जोडण्यात आला, जिथे ते समर्थकांशी संवाद साधत असत.
तेव्हाच्या त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराला टाईल्स लावण्याचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी सार्वजनिक निधी न वापरण्याचा निर्णय घेतला.
इस्रायल इराणला आपले अस्तित्व धोक्यात आणणारा देश मानतो आणि इराणला कधीच अणुशक्ती मिळू देणार नाही असा निर्धार इस्र्यालने व्यक्त करत आला आहे. तर इराणचा दावा आहे की त्यांचा अणुकार्यक्रम पूर्णतः शांततेसाठी आहे.
पण अलीकडच्या काळात इराण 60 टक्के शुद्धतेपर्यंत युरेनियम समृद्ध करत असल्याने चिंता वाढली आहे. कारण 90 टक्के शुद्धतेचे युरेनियम म्हणजे जवळपास अण्वस्त्र तयार करण्याची अणुसामग्री मानली जाते.
एका भारतीय गावातून सुरू झालेली ही खोमेनी यांची ही कहाणी पुढे जाऊन एका संपूर्ण देशाच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वाटचालीला आकार देणारी ठरली. अयातुल्ला खोमेनी यांचे मूळ भारतीय असल्याचा हा इतिहास आजही किंतूर गावात अभिमानाने सांगितला जातो.