Ayatollah Ali Khamenei Funeral Pudhari
आंतरराष्ट्रीय

Ayatollah Ali Khamenei Funeral : मन:पूर्वक आभार! खामेनींच्‍या अंत्यसंस्काराला भारताच्या उपस्थितीबद्दल इराणने व्यक्त केले आभार

भारतातील इराणी दुतावासाने सोशल मीडियावर केली पोस्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Ayatollah Ali Khamenei Funeral : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. भारतानेही आपले प्रतिनिधी पाठवले होते. आता यावर इराणची प्रतिक्रिया आली असून, इराणने याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. भारतातील इराणी दूतावासाने 'X' (ट्विटर) वर केलेल्या एका पोस्टमध्ये, भारताच्या या उपस्थितीला परस्पर आदराची एक 'शक्तीशाली अभिव्यक्ती' म्हटले आहे.

भारताकडून गेले होते शिष्टमंडळ

शुक्रवारी भारतातून गेलेल्‍या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तेहरानमध्ये इराणच्या माजी सर्वोच्च नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. या शिष्टमंडळात बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गरीटा यांचा समावेश होता. या दोघांशिवाय काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या देखील या गटात सामील होत्या. त्याचबरोबर शीख, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचाही या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला होता. दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.

इराणी दुतावासाने 'X' वर लिहिली मोठी पोस्ट

इराणने 'X' वर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले आहेत. पोस्टमध्ये लिहिले आहे की, "इराण ही मैत्री, दयाळूपणा आणि मनापासून दिलेला आदर कधीही विसरणार नाही."

दोन्ही देशांमधील सखोल मानवी संबंध

"इराण इस्लामिक प्रजासत्ताकाचे दूतावास भारताचे मनापासून आभार मानत आहे. विशेषतः त्या अधिकृत शिष्टमंडळासाठी, जे भारत सरकार आणि येथील जनतेच्या वतीने खामेनी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते." या कार्यक्रमात नेते, खासदार तसेच भारतातील विविध धर्म आणि समुदायांच्या प्रमुखांची उपस्थिती दोन्ही देशांमधील सखोल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि मानवी संबंध दर्शवते, असा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

शोकाकुल समर्थकांची अलोट गर्दी

इराणची राजधानी तेहरानमध्ये दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेत आज (दि. ६ जुलै) काळे कपडे परिधान केलेल्या शोकाकुल समर्थकांची अलोट गर्दी उसळली होती. लोक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. 'ट्रम्प मुर्दाबाद'च्या घोषणा देत होते. इराणच्या राष्ट्रध्वजात गुंडाळलेले खामेनी पार्थिव एका ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. २८ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या सुरुवातीला इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेहही याच ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते.

'ट्रम्प यांच्या मृत्यू'च्या घोषणा

इराणी सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये तेहरानच्या आझादी चौकापासून त्याच नावाच्या रस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेली अथांग गर्दी दिसत होती. हा जनसमुदाय २०२० मधील दिवंगत कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेतील गर्दीपेक्षाही मोठा असल्याचे दिसून आले. सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत १० लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी गर्दीच्या संख्येबाबत सध्या कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, ट्रकच्या आजूबाजूला आणि अंत्ययात्रेच्या मार्गावर उपस्थित लोकांच्या हातात फलक, पोस्टर्स आणि बॅनर होते, ज्यांवर ट्रम्प यांच्या मृत्यूची मागणी करणाऱ्या घोषणा लिहिलेल्या होत्या.

ट्रक स्पर्श करण्यासाठी लोकांची धडपड

शोकाकुल लोक ट्रकच्या जवळ जाऊन त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. तर काही लोकांनी आपले स्कार्फ आणि इतर वस्तू ट्रकमधील सहायकांच्या दिशेने फेकल्या, जेणेकरून त्या वस्तूंचा खामेनेई यांच्या पार्थिवाला स्पर्श करता येईल. अंत्ययात्रेतील अथांग गर्दी पाहता अधिकारी सुरक्षेबाबत चिंतेत दिसले. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना हळू चालण्याचे, गर्दी न करण्याचे आणि रस्त्याच्या कडेला राहण्याचे आवाहन केले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT