

तेहरान; वृत्तसंस्था : इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख मेजर जनरल अमीर हातामी यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला. तेहरानमध्ये सुरू असलेल्या अंत्यसंस्कार विधी दरम्यान ते बोलत होते. इराण अधिक ठाम निर्धाराने प्रत्युत्तर देईल. इराणी जनतेच्या शत्रूंना अमेरिका आणि गुन्हेगार झायनिस्ट राजवटीला सांगू इच्छितो की, आम्ही शहीद नेत्याच्या रक्ताचा बदला घेऊ, असे हातामी यांनी अंत्यसंस्कारस्थळी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
दरम्यान, खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून ४ ते ९ जुलैदरम्यान सहा दिवसांचा राजकीय इतमामात अंत्यसंस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, अनेक राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, वरिष्ठ मंत्री आणि धार्मिक नेते तेहरानमध्ये दाखल झाले आहेत. सुमारे दीड ते दोन कोटी नागरिक अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेत सहभागी होतील, असा अंदाज इराणी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
३ जुलैपासून तेहरानमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालीबाफ, न्यायव्यवस्था आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यांनी खामेनी यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली. काळ्या पगडीने सजवलेल्या शवपेटीपाशी राष्ट्राध्यक्षांनी प्रार्थना केली. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) चे प्रमुख अहमद वहिदी यांनीही युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या हजेरी लावत खामेनी यांना श्रद्धांजली वाहिली. सुरक्षा कारणांमुळे ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांचे पार्थिव गुरुवारी तेहरानमधील त्यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणी नेण्यात आले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात त्यांची हत्या झाली होती. हा कार्यक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता पार पडला. त्यानंतर राज्य इतमामात होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले. अंत्यसंस्कार कार्यक्रमात १ ते २ कोटी नागरिक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे हा इराणच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय अंत्यसंस्कारांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन तेहरानमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरभर पोलिस नाके, लष्करी वाहने, अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी आणि देखरेख यंत्रणा कार्यरत आहे. तेहरानमधील सरकारी, खासगी कार्यालये सोमवारपर्यंत बंद ठेवली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात खासगी वाहनांवर निर्बंध घातले आहेत. तेहरानचे हवाई क्षेत्र शुक्रवारपासून अंशतः बंद केले असून, सोमवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. तेहरान, कोम आणि मशहद या शहरांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने अमेरिकेला आणि इस्रायलला कठोर इशारा दिला आहे. या काळात इराणवर किंवा अंत्यसंस्कार सोहळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास यापूर्वीपेक्षा अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे आयआरजीसीने स्पष्ट केले. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी हेही लक्ष्य असल्याचा दावा केल्यानंतर इराणने सुरक्षा वाढवत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीरे, गृहमंत्री मोहसिन नक्वी उपस्थित आहेत. भारताकडून केंद्रीय राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा, सईद अताह हसनैन, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, वरिष्ठ अधिकारी, धर्मगुरू उपस्थित आहेत. ताजिकिस्तान, आर्मेनिया आणि जॉर्जिया या देशांचे राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुख उपस्थित आहेत, तर भारत, चीन, रशिया, तुर्की, अफगाणिस्तान आणि बांगला देशसह अनेक देशांनी वरिष्ठ प्रतिनिधी पाठवले आहेत.
४ आणि ५ जुलै
तेहरानमध्ये सार्वजनिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अली खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे पार्थिव ग्रँड मोसल्ला येथे सर्वसामान्य नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
६ आणि ७ जुलै
अंत्ययात्रा तेहरानमधील विविध भागांतून काढण्यात येईल. त्यानंतर ती इराणमधील शिया इस्लामचे प्रमुख धार्मिक शिक्षणकेंद्र मानल्या जाणाऱ्या कोम शहरात पोहोचेल. अली खामेनी यांनी याच ठिकाणी धार्मिक शिक्षण घेतले होते.
८ जुलै
इराकमधील नजफ आणि कर्बला येथे सार्वजनिक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. नजफ येथील इमाम अली दर्गा हे शिया मुस्लिमांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. कर्बला येथील इमाम हुसेन आणि त्यांचे सावत्र बंधू अब्बास यांच्या दर्ग्यांनाही शिया मुस्लिमांमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे.
९ जुलै
अली खामेनी यांचे पार्थिव पुन्हा इराणमध्ये आणण्यात येईल. त्याच दिवशी मशहद येथील इमाम रझा दर्गा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.