शेख हसीना यांनी सोमवारी बांगला देशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला.  (PTI)
आंतरराष्ट्रीय

Bangladesh protest | हिंसाचारामागे चीन कनेक्शन?; शेख हसीनांना केले होते अलर्ट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी सोमवारी बांगला देशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. त्यानंतर बांगला देशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी लष्कराने देशाचा ताबा घेत अंतरिम सरकार स्थापत असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, गेल्या वर्षी जनरल वकार-उझ-झमान यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याच्या संभाव्य धोक्याबद्दल भारतातील उच्चपदस्य अधिकाऱ्यांनी बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सतर्क केले होते. झमान यांचा चीन समर्थक म्हणून कल असल्याचे हसीना यांना निदर्शनास आणून दिले होते. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले होते.

पण, तरीही हसीना यांनी झमान यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. हा निर्णय त्यांच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार होण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

झमान यांनी हसीना यांना केवळ अल्टिमेटम जारी केले

आरक्षणविरोधी आंदोलन (Bangladesh protest) आणि यातून पेटलेल्या वणव्याने अखेर बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सिंहासनालाच सुरुंग लागला. जनतेच्या उठावाने त्यांची सत्ता उलथवून टाकली. हजारो आंदोलकांनी सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करताच हादरलेल्या शेख हसीना यांनी तातडीने राजीनामा दिला आणि त्यांनी लष्कराच्या विमानाने बांगला देशातून काढता पाय घेतला. बांगला देश सरकारने आंदोलकांवर कारवाई केल्याने सुमारे ३०० लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. देशातील वाढत्या आंदोलनादरम्यान संबोधित करण्याऐवजी झमान यांनी हसीना यांना अल्टिमेटम जारी केले. त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने देश सोडून जाण्याची मागणी केली. झमान यांनी असेही जाहीर केले की अंतरिम सरकार तात्काळ प्रभावाने सत्ता ताब्यात घेईल आणि त्यांनी नागरिकांना सैन्यावर विश्वास ठेवण्याचे आ‍वाहन केले.

इस्लामी गट देशाच्या राजकारणाचा प्रमुख चेहरा बनणार?

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, विरोधी बीएनपी पक्षाच्या नेत्या खालिदा झिया यांना अटकेतून सोडण्याच्या लष्कराच्या तात्काळ निर्णयाने असेही सूचित होते आहे की जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्रशिबिर सारखे इस्लामी गट बांगला देशाच्या राजकारणात प्रमुख चेहरा बनण्याची शक्यता आहे. (bangladesh news)

हसीनांना देश सोडण्यासाठी दिला होता अवघ्या ४५ मिनिटांचा अवधी

बांगला देशच्या लष्कराने शेख हसीना यांना देश सोडून जाण्यासाठी अवघ्या ४५ मिनिटांचा अवधी दिल्याचेही वृत्त आहे. देश सोडण्यापूर्वी हसीना यांना राष्ट्राला संबोधित संदेश प्रसारित करायचा होता, परंतु लष्कराने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली नाही.

भारताने बोलावली सर्वपक्षीय बैठक

हसीना शेख बांगला देशातून सोमवारी भारतात दाखल झाल्या. दिल्लीच्या हिंडन एअरबेसवर उतरल्यानंतर हसीना यांचा एका सुरक्षित ठिकाणी मुक्काम राहिला. दरम्यान, बांगला देशमधील संकटावर चर्चा करण्यासाठी भारताने मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, सरकार बांगला देश लष्कराच्या संपर्कात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT