पुढारी ऑनलाईन डेस्क : शेख हसीना यांच्या बांगला देशच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यानंतर आंदोलक शांत झालेले नाहीत. त्यांचे आंदोलन सुरुच आहे. याची झळ बांगला देशातील सर्वसामान्य नागरिकांसह सर्वांना बसत आहे. यामध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, सध्या क्रिकेटर लिटन दास याच्या नावावरुन एक सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला आहे. आंदोलकांनी बांगला देशचा दिग्गज क्रिकेटपटू मशरफी मुर्तझा आणि लिटन दास यांच्या घराला आंदोलकांनी आग लावली आहे. या घटनेचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
बांगला देशमध्ये आंदोलकांनी देशाचा माजी क्रिकेट कर्णधार मशरफी बिन मोर्तझा यांच्या घराला आग लावली. मशरफी बिन मुर्तझा हे खुलना विभागातील नराइल-2 मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला बांगला देशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अवामी लीगचे उमेदवार म्हणून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंदोलकांनी मशरफी बिन मुर्तझा यांच्या घराची तोडफोड करत ते पेटवून दिले आहे.
क्रिकेटर मशरफी बिन मुर्तझा, बांगला देशचा हिंदू क्रिकेट खेळाडू लिटन दासच्या घरालाही आंदोलकांनी आग लावली आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लिटन दास हा बांगला देशी हिंदू आहे. आंदोलक सातत्याने हिंदूंना लक्ष्य करत आहेत. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लिटन दास बांगला देशकडून तिन्ही फॉरमॅट क्रिकेट खेळतो. तो संघातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. लिटन दासने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 41 कसोटी सामन्यांमध्ये 3 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2461 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 91 सामन्यांमध्ये 2563 धावा केल्या आहेत. यात 5 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 89 सामन्यांत1944 धावा केल्या आहेत.