India Nuclear Warheads Deployed: दक्षिण आशियात रणनैतिक बॅलेन्स आणि लष्करी ताकद याबाबतची एक मोठी घडामोड गेल्या काही दिवसात घडत आहे. जागतिक शस्त्रास्त्र देखरेख करणाऱ्या स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात SIPRI ने एक नवीन रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर भारताचा शेजारी देश पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली आहे. या रिपोर्टनुसार भारताने इतिहासात पहिल्यांदाच आपल्या अण्विक शस्त्रे फक्त स्टॉकपाईल मध्ये ठेवलेले नाही तर त्यांनी थेट ऑपरेशनल मोडमध्ये तैनात केली आहेत.
या रिपोर्टनंतर लगेचच पाकिस्तान सरकारकडून परराष्ट्र मंत्रालयाने धसका घेतल्याचं वक्तव्य केलं. यात पाकिस्तान भारताची अण्विक ताकद आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार खूप जास्त आणि घातक असू शकते असं मान्य केलं.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करत भारताची रणनैतिक क्षमता वाढली असून भारताने आपली अण्विक शस्त्रांबाबतची भूमिका देखील बदलली असल्याचे मान्य केलं. या बदलत्या भूमिकेवर पाकिस्तानची बारीक नजर असल्याचं देखील पाकिस्ताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. खासकरून भारताच्या मिसाईल सिस्टमच्या कॅनिस्टराईजेशनबाबत पाकिस्ताननं जास्तच धास्ती घेतली आहे.
कॅनिस्टराईजेशन हे एक असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यात अण्विक वॉरहेडला आधीपासूनच मिसाईलच्या आत सील करून ठेवता येऊ शकतं. यामुळं युद्धाच्या स्थितीत मिसाईल फार कमी वेळेत अत्यंत वेगान फायर करता येतं.
मिळालेल्या माहितीनुसार भारताजवळ सध्याच्या घडीला १९० अण्विक शस्त्रे आहेत. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे या १९० पैकी १२ अण्विक शस्त्रे ही ऑपरेशनल स्वरूपात तैनात करण्यात आली आहेत. पहिल्यांदाच कोणत्यातरी जागतिक सुरक्षा समितीने भारताच्या अण्विक शस्त्रांना फक्त स्टॉक म्हणून न संबोधता पूर्णपणे सक्रिय लष्करी तैनातीच्या स्वरूपात पाहिलं आहे.
पाकिस्तानने या रिपोर्टचा हवाला देत दावा केला की भू, जल आणि हवा या तीनही आघाड्यांवर अण्विक हल्ला करण्याची भारताकडे क्षमता आहे. ही क्षमता आता पूर्णपणे परिपक्व झाली असून खूप मोठ्या संकटात भारताची ही ऑपरेशनल तयारी युद्धाच्या तयारीला अनेक पटीनं वाढवते.
भारताची ही वाढती लष्करी आणि अण्विक ताकद पाहून पाकिस्तानला धडकी भरली आहे. तो जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली देशांकडे आपल्या दुखड्याचे रडगाणे गात आहे. भारताला प्रगत लष्करी आणि आधुनिक शस्त्रे सप्लाय करणाऱ्या देशांनी ते त्वरित थांबवावं यासाठी आता पाकिस्तान त्यांच्या हातापाया पडत आहे.