

India On Islamic NATO: तुर्कस्तान नाटोच्या धरतीवर इस्लामिक नाटो तयार करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसोबत तुर्की चर्चा करत आहे. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. तुर्कस्तान हा सुरक्षा करार नाटोच्या आर्टिकल ५ च्या धरतीवर तयार करण्याची शक्यता आहे. या करारात सामील असलेल्या प्रत्येक देशावरील हल्ला हा या करारातील प्रत्येक देशावर हल्ला मानला जाईल. जर असा करार अन् आघाडी झाली तर भारतासमोरील लष्करी आव्हाने अजून वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
यापूर्वी हा करार सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता. आता यात तुर्कीचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे. या संभाव्य करारानुसार सौदी अरेबिया यासाठी आर्थिक सहाय्य करेल, पाकिस्तान अण्विक बाजू सांभाळेल, त्यांच्याकडे बॅलेस्टिक मिसाईलची चांगली क्षमता आहे तसेच मनुष्यबळ देखील चांगलं आहे. तर तुर्कीला लष्करी अनुभव चांगला आहे. लष्करी उपकरणांचा देशांतर्गत असलेला चांगला उद्योग याचे योगदान तुर्की देऊ शकतो असे मत निहात अली ओझकन यांनी व्यक्त केले. ते अंकारा (तुर्की) मधील TEPAV थिंक टँकचे रणनितीकार आहेत.
ओझकान म्हणाले की, 'जर अमेरिका इस्त्रायलच्या आसपासच्या भागात त्यांच्या हितालाच फक्त प्राधान्य देत असेल, या भागातील समीकरणे बदलणार असतील अन् संघर्ष वाढणार असेल तर इतर देशांना नवीन मित्र अन् सहकारी शोधून एक नवी व्यवस्था निर्माण करावी लागेल.'
अनेक जाणकारांच्या मते तुर्कीची लष्करी अन् सुरक्षेच्या बाबतचे रणनैतिक भागीदारी करण्याचे पाऊल लॉजिकल आहे. या तीनही देशांनी आधीपासूनच सहकाऱ्याच्या बाबतीत वाटाघाटी करण्यास सुरूवात केली आहे. तुर्कीच्या डिफेन्स मिनिस्ट्रीनुसार त्यांनी पहिली या आठवड्याच्या सुरूवातीला पहिली नेव्हल मिटींग घेतली होती.
तुर्की फक्त या भागातील एक लष्करी ताकद असलेला देश नाहीये तर तो युएसच्या नेतृत्वातील नाटोचा एक सदस्य देश देखील आहे. नाटोमधील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर हे तुर्कीच्या जवळ आहे.
दुसऱ्या बाजूला सौदी अरेबिया आणि तुर्की यांचा शिया बहूल इराण हा एक कॉमन शत्रू आहे. त्यांचे इराणसोबत लष्करी खटके उडत असले तरी ते सिरिया आणि पॅलेस्टाईन विषयावर एकत्र आहेत.
पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातील लष्करी संबंध मजबूत आहेत. तुर्की पाकिस्तान नेव्हीसाठी वॉरशिप देखील तयार करत आहे. त्यांनी पाकिस्तानी एफ-१६ फायटर जेट्सचे देखील आधुनिकीकर केले आहे. त्याचबरोबर तुर्की सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दोघांसोबत आपलं तंत्रज्ञान शेअर करतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर हे तीन देश नाटोच्या धरतीवर करार करण्यासाठी चर्चा करत आहेत. या संघर्षावेळी तुर्कीने पाकिस्तानला साथ दिली होती. त्यांनी आधुनिक ड्रोन्स पाकिस्तानला पुरवले होते.