

Trump On Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या लष्करी संघर्ष सुरू असून पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा यांना तर अफगाणिस्तानविरूद्ध खुलं युद्ध सुरू केल्याची वल्गना केली आहे. दरम्यान, या युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे जगभरातील युद्धे संपवण्यात माहीर असल्याचा त्यांचा दावा असतो. त्यांनी या युद्धात पाकिस्तानची बाजू घेत पाकिस्तानला खूप चांगले पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख लाभले असल्याचं म्हणत हस्तक्षेप करण्यास अप्रत्यक्षरित्या नकार दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'मी यात हस्तक्षेप करू शकतो मात्र पाकिस्तानला चांगले पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख लाभले आहेत. तुम्हाला खूप चांगले लीडर मिळाले आहेत. या दोन लोकांबद्दल मला खूप आदर आहे. मला वाटतं की पाकिस्तान भयानकरित्या चांगलं करत आहे.'
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी अफगाणिस्तानविरूद्ध खुलं युद्ध पुकारल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील २९ ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केला. त्यात कंदहार, काबुल या मोठा शहरांचा देखील समावेश होता.
पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्यांनी २९७ अफगाण तालिबानी आणि दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे. तर तालिबान सरकारचे प्रवक्ते झाबिहुल्ला मुजाहीद यांनी अफगाणिस्तानच्या सेनेनं ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा आणि काही सैनिकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाविरूद्धचा कोणताही आक्रमकपणा देशाचे सैन्य दल मोडून काढणार असं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, आमच्या सशस्त्र दलांकडे देशाविरूद्धचे कोणतेही आक्रमक पाऊल ठेचून काढण्याची क्षमता आहे. संपूर्ण देश पाकिस्तान लष्कराच्या बाजूनं खांद्याला खांदा लावून उभा आहे.'
दरम्यान, पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्षाबाबत अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी देखील प्रतिक्रिया देत पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पाकिस्तानला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे असं म्हणत, 'तालिबान सातत्यानं दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयशयी ठरत आहे. ते दहशतवादाला खतपाणी घालून हा भाग अस्थीर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादी ग्रुप पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करण्यासाठी अफगाणिस्तानचा लाँचिग पॅडसारखा वापर करत आहेत.' असं वक्तव्य प्रसिद्ध केलं.
दरम्यान, ब्रिटननं दोन्ही देशांनी लष्करी कारवाया थांबवाव्यात असं सांगितलं असून चीन आणि इराण यांनी शस्त्रसंधी करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावण्यास तयार असल्याचं देखील म्हटलं आहे.