प्रातिनिधिक फोटो. AI-generated image.
आंतरराष्ट्रीय

Human Dog Relationship History| माणूस-कुत्र्याचे नाते हिमयुगापासून! १५ हजार वर्षांचे रहस्य विस्‍मरणात गेलेल्‍या हाडाने उलगडले

Human Dog Relationship History | नवीन संशोधनामुळे माणूस–कुत्र्याच्या मैत्रीचा इतिहासच बदलला

पुढारी वृत्तसेवा

Human Dog Relationship History

लंडन : घोडा, मांजर की कुत्रा—माणसाचा सर्वात जुना पाळीव प्राणी कोणता? या प्रश्नावर सर्वसामान्‍यांमध्‍ये अनेक वर्षे खल सुरू आहे. या चर्चेत मानवावर शब्दांतीत प्रेम करणारा कुत्रा हाच अग्रस्थानी आहे. हजारो वर्षांपासून मानवाबरोबर या पाळीव प्राण्यांचे नातेही खास राहिले आहे. आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करणारा हा प्राणी प्राचीन काळापासून मानवाचा सर्वात विश्वासू साथीदारही आहे. आता मानव आणि कुत्रा यांच्यातील नाते किती प्राचीन आहे? या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ पुरावा ब्रिटनमधील संशोधकांना सोमरसेट (इंग्लंडच्या नैऋत्य भागातील ऐतिहासिक महत्त्व असणारा जिल्हा) मधील एका खोल गुहेत सापडला आहे. या संशोधनामुळे माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीचा इतिहासच बदलला आहे.

संशोधनात काय आढळलं?

'नेचर' या प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झालेल्या दोन शोधनिबंधांनुसार, कुत्र्यांच्या जनुकीय इतिहासाचा पुरावा आता चक्क १४,००० ते १६,००० वर्षे मागे गेला आहे. ब्रिटनमधील संशोधकांना सोमरसेट (इंग्लंडच्या नैऋत्य भागातील ऐतिहासिक महत्त्व असणारा जिल्हा) मधील एका खोल गुहेत सापडला आहे. डीएनए चाचणीतून असे सिद्ध झाले आहे की, हा जबडा १५,००० वर्षांपूर्वीच्या एका पाळीव कुत्र्याचा होता. विशेष म्हणजे, माणसाने शेती करायला सुरुवात करण्यापूर्वी किंवा मांजरी पाळण्याआधी हजारो वर्षे हा इमानी प्राणी माणसाचा सोबती बनला होता. या नवीन पुराव्यामुळे कुत्र्यांच्या उत्क्रांतीचा काळ तब्बल ५,००० वर्षांनी मागे गेला असून, अश्मयुगातील आदिमानव आणि कुत्रे यांच्यात सुरुवातीपासूनच अत्यंत जवळचे नाते होते, हे आता वस्तुनिष्ठ पुराव्यांनी सिद्ध झाले आहे.

संशोधकांनी १४,३०० वर्षे जुन्या कुत्र्यांच्या जबड्यांच्या हाडांमधील जनुकीय माहितीचे विश्लेषण केले आहे. या माध्‍यमातून कुत्र्यांच्या वंश राखाडी रंगाच्‍या लांडग्यांपासून कसा निर्माण झाला, याचा मागोवा घेता येणार आहे. (फोटो सौजन्य : Trustees of the Natural History Museum)

एका विस्मरणात गेलेल्या हाडाने उलगडले १५,००० वर्षांच्या नात्याचे रहस्य!

संशोधक डॉ. विल्यम मार्श यांनी त्यांच्या पीएचडीच्या अभ्यासादरम्यान हा विलक्षण शोध अगदी योगायोगाने लावला. वास्तविक, हा कुत्र्याच्या जबड्याचा तुकडा १९२० च्या दशकात इंग्लंडमधील प्रसिद्ध 'गॉफच्या गुहेत' सापडला होता. परंतु, तो एक सामान्य हाडाचा तुकडा असावा, असे समजून कित्येक दशके एका संग्रहालयाच्या कपाटात धूळ खात पडून होता. मार्श यांना १० वर्षांपूर्वीचा एक जुना शोधनिबंध वाचायला मिळाला, ज्यातून त्यांना शंका आली की हे हाड कुत्र्याचे असू शकते. त्यांनी कुतूहल म्हणून या हाडाची डीएनए तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांना सुखद धक्का बसला. ते हाड खरोखरच एका पाळीव कुत्र्याचे होते, जे अपेक्षेपेक्षा हजारो वर्षे जुने होते. कुत्रा हा तब्बल १५,००० वर्षांपूर्वीपासून माणसासोबत आहे, हे सिद्ध करणारा हा जगातील पहिला ठोस पुरावा ठरला. डॉ. विल्यम मार्श यांनी याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातील आपले सहकारी डॉ. लॅची स्कार्सब्रुक यांना दिली, ज्यांनी यापुढील संशोधनाची सूत्रे हाती घेतली.

लांडगा आणि कुत्र्यातील फरक झाला स्पष्ट!

'बीबीसी न्यूज'शी बोलताना संशोधक डॉ. स्कार्सब्रुक यांनी स्पष्ट केले की, लांडगे आणि कुत्रे यांच्यातील जनुकीय (DNA) फरक शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते; परंतु कुत्र्यांची नेमकी सुरुवात कोठून झाली, हे सांगणे कठीण जात होते. इंग्लंडमधील सोमरसेटमधील गुहेत सापडलेला हा छोटासा जबडा संशोधकांसाठी एक 'गुरुकिल्ली' ठरला आहे. या एका पुराव्यामुळे युरोपभर विखुरलेल्या इतर अनेक प्राचीन नमुन्यांची ओळख पटवणे आता सोपे झाले आहे. हा शोध म्हणजे केवळ एक हाडाचा तुकडा नसून, लांडगा आणि आजचा पाळीव कुत्रा यांच्यातील दुवा जोडणारा सर्वात मोठा ऐतिहासिक पुरावा ठरला आहे.

आजचे कुत्रे हे राखाडी लांडग्यांचेच वंशज!

नवीन संशोधनावरून स्पष्ट होते की, १५,००० वर्षांपूर्वीच माणूस आणि कुत्रा यांच्यात अत्यंत घट्ट आणि जवळचे नाते निर्माण झाले होते. दिसायला जरी हा जबड्याचा तुकडा छोटा असला, तरी त्याने माणूस आणि कुत्र्याच्या मैत्रीची संपूर्ण ऐतिहासिक कथाच उलगडून दाखवली आहे. आजचे कुत्रे हे राखाडी लांडग्यांचेच वंशज आहेत. हिमयुगाच्या शेवटी हे लांडगे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांच्या आसपास वावरू लागले, तिथे उरलेले अन्न खाऊ लागले आणि हळूहळू माणसाळले गेले. अशा प्रकारे या लांडग्यांपासूनच मानवाच्या पहिल्या पाळीव मित्राची—कुत्र्याची निर्मिती झाली, असे या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.

युरोप ते तुर्कीपर्यंतच्या 'डीएनए' चाचणीतून अवाक करणारा खुलासा

'नेचर' मासिकात प्रसिद्ध झालेल्या या शोधामुळे माणूस आणि कुत्र्याच्या नात्यातील एक अतिशय भावनिक पैलू समोर आला आहे. नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या डॉ. सेलिना ब्रेस यांच्या मते, केवळ त्यांचे 'डीएनए' (DNA) सारखे होते असे नाही, तर त्या काळातील कुत्रे आपल्या मालकांप्रमाणेच अन्न खात होते. तुर्कीमध्ये राहणारे कुत्रे मासे खात होते, तर इंग्लंडमधील गुहेत राहणारे कुत्रे मानवाप्रमाणेच मांस आणि कंदमुळे खात होते. यावरून हे सिद्ध होते की, १५,००० वर्षांपूर्वीही या दोन्ही जीवांमध्ये इतके जवळचे नाते होते की ते एकत्र जेवण करत असत. जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडमधील गुहांमध्येही असे पुरावे सापडले आहेत, जिथे कुत्र्यांना त्यांच्या मालकांसोबतच सन्मानाने पुरण्यात आले होते. आज आपण आपल्या पाळीव कुत्र्यांवर जेवढे प्रेम करतो, अगदी तशीच मैत्री अश्मयुगातील मानवाच्या काळातही अस्तित्वात होती, हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.

नवीन संशोधन महत्त्वपूर्ण का?

'नेचर' मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका वेगळ्या अभ्यासानुसार, आज आपल्या घरात असणारे सर्व पाळीव कुत्रे हे 'दुहेरी वंशाचे' आहेत. याचा अर्थ असा की, हिमयुगाच्या शेवटी उत्तर गोलार्धात कुत्र्यांच्या दोन वेगवेगळ्या गटांपासून आजच्या कुत्र्यांची उत्पत्ती झाली. 'फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट'च्या डॉ. अँडर्स बर्गस्ट्रॉम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीडन, स्वित्झर्लंडपासून ते तुर्की आणि आर्मेनियापर्यंतच्या विविध गुहांमध्ये सापडलेल्या २०० हून अधिक कुत्रे आणि लांडग्यांच्या अवशेषांची तपासणी केली. या महाप्रचंड संशोधनामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, कुत्र्यांचे पूर्वज हे हजारो वर्षांपूर्वीच अर्ध्याहून अधिक जगात पसरले होते.

सायबेरिया ते युरोप... सर्व कुत्र्यांचा पूर्वज एकच!

संशोधकांनी प्राचीन कुत्र्यांच्या 'डीएनए'चा (DNA) सखोल अभ्यास केला, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. गॉफच्या गुहेत सापडलेले कुत्रे आणि सायबेरिया किंवा पूर्व आशियात आढळणारे कुत्रे हे सर्व एकाच सामायिक पूर्वजाचे वंशज आहेत. याचा अर्थ असा की, कुत्र्यांची उत्पत्ती जगाच्या कोणत्यातरी एका भागात झाली आणि तिथून ते मानवासोबत सर्वत्र पसरले.

शिकारातील मदतनीस ते घराचे रक्षण करणारा विश्वासू साथीदार

प्राचीन काळापासून माणसाने या प्राण्यांचा वापर शिकार करण्यासाठी, घराचा पहारा देण्यासाठी आणि शत्रूचा माग काढण्यासाठी सुरू केला. अशा प्रकारे, एकेकाळचा हा जंगली शिकारी प्राणी माणसाचा विश्वासू साथीदार बनला. पुढील शेकडो वर्षांत माणसाने आपल्या गरजेनुसार कुत्र्यांच्या विविध जाती तयार केल्या. यामुळेच कुत्र्यांच्या आकारात आणि स्वरूपात मोठा बदल झाला. त्यांचे जबडे आणि दात लहान झाले. आज आपल्याला मांडीवर बसणाऱ्या छोट्या कुत्र्यांपासून ते घराचे रक्षण करणाऱ्या धिप्पाड कुत्र्यांपर्यंत जी प्रचंड विविधता दिसते, ती याच प्रक्रियेचा परिणाम आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT