

मोहन दाते, पंचांगकर्ते
होळी हा सण फार प्राचीन काळापासून साजरा करण्याची परंपरा आपल्या धर्मात आहे. पुराणातील कथेनुसार समाजातील वाईट शक्तींना आणि माणसामाणसातील राग, द्वेष नष्ट करण्यासाठी प्रतीकात्मक रूपात हा सण साजरा केला जातो. होळीच्या निमित्ताने केला जाणारा शिमगा हा एक प्रकारचा मानसिक उपचार असून मनातील किल्मिषे काढून टाकण्याचा तो एक मार्ग आहे. रंगांचा उत्सव हा परस्परांतील स्नेहभाव वाढविण्यासाठी आणि वसंतोत्सवातील निसर्गाला फुटलेल्या नव्या पालवीच्या स्वागतासाठी साजरा करण्यात येणारा आनंदोत्सव आहे; पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलत चालले आहे. रासायनिक रंगांचा वापर, होळीसाठी होणारी वृक्षतोड यामुळे नैसर्गिक समतोल ढासळत चालला आहे. तो ढासळू न देणे आपले कर्तव्य आहे आणि ते आपल्याच हातात आहे.
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण सर्वत्र होळीचा उत्सव साजरा करतो. यावेळी आपण मोठा अग्नी पेटवून त्याला नेवैद्य दाखवतो, पूजा करतो, शिमगा करतो. या सर्व कृतींमागे पुराणात असलेल्या कथेची परंपरा आहे. प्राचीन काळी होलिका नावाची राक्षसीण होती. ती लहान मुलांना खूप त्रास द्यायची. त्यामुळे तिच्याबद्दल खूप भय निर्माण झाले होते. ही राक्षसीण जळून जावी म्हणून त्या काळी मोठ्या प्रमाणात होळी पेटवण्याची परंपरा सुरू झाली. तसेच तिने मुलांजवळ येऊ नये, घाबरून पळून जावे म्हणून मोठ्या आवाजात शिमगा करण्याची पद्धत रूढ झाली. शंखध्वनी करणे, बोंब मारणे हे शब्द त्यातूनच निर्माण झाले. थोडक्यात, वाईट शक्तीला हुसकावून लावणे असा त्यामागचा अर्थ आहे. याचा आणखी एक आशय असाही आहे की, प्रत्येक माणसाच्या मनात कुठल्या ना कुठल्या वाईट विचारांचा, गोष्टींचा प्रादुर्भाव असतो. मनातील या भावना व्यक्त केल्या, तर मन मोकळे होते. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ करणे यासारखी कृती केल्यामुळे मनातील राग, द्वेष यानिमित्ताने बाहेर पडतो, भावना मोकळ्या होतात. मनातील एखाद्याबद्दलचा आकस सैल होतो. म्हणूनच या दिवशी अशा पद्धतीने शिमगा करण्याची पद्धत आहे. मनातील या कटू भावना काढून टाकून मन पुन्हा ताजेतवाने बनविण्यासाठी ही पद्धत रूढ झाली असावी. म्हणूनच यावेळी एखाद्याला काही बोल लावले, तरी त्याचा राग येऊ देऊ नये असे म्हटले जाते. हा एक मानसिक उपचार आहे, असेही मानतात. म्हणूनच यावेळी ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणतात. यावेळी प्राचीन काळी होलिका नावाच्या राक्षसिणीचे दहन झाले होते. म्हणून याला होलिकादहन असे नाव पडले.
आपण ज्याप्रमाणे इतर सणांच्या निमित्ताने श्रीखंड, शिरा, लाडू, करंज्या असे गोडाधोड पदार्थ करतो, तसे होळीच्या निमित्ताने घराघरांत पुरणपोळी केली जाते. हा वसंतोत्सवाचा काळ असतो. हवेतील गारठा संपून म्हणजेच थंडी संपून हवामानात उष्णता वाढण्याकडे कल असतो. अशा काळात होळी पेटवून त्यातून वातावरण तापण्यास मदत केली जाते, जेणेकरून हवामानातील हे बदल लवकर व्हावेत आणि पुढचा मान्सून लवकर यावा, असा उद्देश असतो. होळी ज्यावेळेला येते तो काळ ॠतूबदलाचा असतो. या काळामध्ये हवेत मोठ्या प्रमाणात विषाणू तयार होतात. त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. होळी पेटविल्यामुळे हवेतील विषाणू काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते आणि आजूबाजूची हवा शुद्ध होते. म्हणजे थोडक्यात, होळी पेटविणे हे आरोग्याच्या द़ृष्टीनेही महत्त्वाचे आहे. होळीला देवतेचे स्वरूप मानले गेल्यामुळे दुसर्या दिवशी अग्नी शांत झाल्यानंतर ती राख अंगाला अंगारा म्हणून प्रतीकात्मक रूपात लावली जाते. त्याला धूलिवंदन म्हटलेले आहे. बर्याच ठिकाणी या दिवशी धुळवड खेळली जाते, तर काही ठिकाणी धुळवडीच्या दिवशीच रंग खेळले जातात.
होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण येतो. या दिवशी एकमेकांना रंग लावून स्नेहभाव वृद्धिंगत केला जातो. रंगपंचमी हा सामाजिक सण म्हणून ओळखला जातो. कारण, या सणाच्या निमित्ताने एकमेकांमधील राग-लोभ दूर सारून मोकळ्या मनाने परस्पराना रंग लावले जातात. माणसामाणसात जवळीक साधावी, मैत्री व्हावी, स्नेहाचे धागे जुळावेत हा या मागचा हेतू आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना फिरायला मिळत नसे. समाजात फारसे मिसळता येत नसे. रंगपंचमीच्या निमित्ताने मोकळ्या वातावरणात रंगांची उधळण होते, परस्परांबद्दल स्नेह वाढतो, मन आनंदी होते, हाच हा सण साजरा करण्यामागचा हेतू आहे.
गेल्या काही वर्षांत मात्र होलिकोत्सव, रंगोत्सव साजरा करण्याचे स्वरूप बदलत चालले आहे. या बदलत्या स्वरूपामुळे नैसर्गिक समतोल ढासळत चालला आहे. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रासायनिक रंग, पेंट यांचा वापर रंग खेळण्यासाठी केला जातो. हे रंग शरीराला हानिकारक ठरणारे असतात. वास्तविक पाहता यावेळी नैसर्गिक रंग वापरणे अपेक्षित आहे. मुळात कोणताही उत्सव साजरा करताना आरोग्याचा विचार दुर्लक्षित करणे हिताचे नाही. खरं तर, एकमेकांना रंग लावणे हा एकमेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला ज्या व्यक्तीला रंगवायचे आहे, जी आपल्या जवळची आहे, आवडती आहे, जिच्याबद्दल स्नेह आहे अशाच व्यक्तीला यावेळी रंग लावायचा असतो; पण काही ठिकाणी या नियमांना बदल दिली जाते.
भारतीय परंपरेतील कोणतेही सण, उत्सव साजरीकरणाच्या प्रथा-परंपरा पाहिल्यास त्या निसर्गाशी, लोकजीवनाशी, पर्यावरणाशी, संस्कृतीशी अनुकूलता दर्शवणार्या आहेत. रंगोत्सवातही हे भान जपायलाच हवे. यासाठी हर्बल, नैसर्गिक रंगांचाच वापर करणे आवश्यक आहे. रंगपंचमीदरम्यान पाण्याची नासाडी टाळणे आवश्यक आहे. यासाठी शक्यतो कोरडेच रंग वापरावेत आणि तेच अपेक्षितही आहे; पण रंग ओले करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. मार्च महिन्याचा कालावधी परीक्षांचा असतो. गार पाण्यात खेळल्यामुळे मुले आजारी पडतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. पूर्वीच्या काळी हा काळ परीक्षांचा नव्हता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून स्वतःच्या आरोग्यासाठी आपण निसर्ग नियमांबरोबरच सण साजरा करण्यामागचे नियमदेखील पाहिले पाहिजेत. होळी पेटविण्यासाठी हल्ली मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. खरे तर, होळी पेटविण्यासाठी सरपण, पालापाचोळा आणि गौर्या यांचाच वापर करणे अपेक्षित आहे; पण तसे होत नाही. अनेक सणांच्या बाबतीत आपण त्या सणाच्या मूळ परंपरा मोडून वेगळेच काहीतरी करत असतो. होळीच्या बाबतीतही तसेच होताना दिसते. तसे होऊ न देणे ही आपलीच जबाबदारी आहे.
वसंतोत्सवाचा हा काळा म्हणजे निसर्गातील बदलाचा काळ असतो. यावेळी आपण होळी पेटविणे, रंग खेळणे असे प्रतीकात्मक सण साजरे करतो. या सर्व परंपरा निसर्गाशी मिळत्या जुळत्या आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या काळात झाडांची पाने गळून त्याला नव्याने पालवी फुटलेली असते. निसर्गाच्या या बदलाचे आपण आनंदोत्सवाने स्वागत केले पाहिजे आणि तशाच प्रकारे हा उत्सव साजरा केला पाहिजे. आनंदोत्सवाचा हा काळ आपण मोकळ्या मनाने साजरा केला पाहिजे. आपल्या चुकीच्या वागण्याने या उत्सवाचे स्वरूप बदलू नये आणि यामागचा आनंद हरवू नये, हीच अपेक्षा!