Jet Stream Weather | जेट स्ट्रीम आणि विरोधाभासी हवामान

Jet Stream Weather
Jet Stream Weather | जेट स्ट्रीम आणि विरोधाभासी हवामान
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

2025 च्या अखेरीस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीपूर्वी जगाने हवामानातील असे टोकाचे विरोधाभास पाहिले, ज्यांनी वैज्ञानिकांसह सामान्य नागरिकांनाही अंतर्मुख केले. एकीकडे वाळवंटी सौदी अरेबियामध्ये बर्फवृष्टीने संपूर्ण परिसर पांढर्‍या चादरीत लपेटला गेला, तर दुसरीकडे आर्क्टिक सर्कलच्या जवळ असलेल्या आईसलँडमध्ये उन्हाळ्याची आठवण करून देणारी उष्णता नोंदवली गेली. या घटना केवळ विचित्र नाहीत, तर बदलत्या जागतिक हवामानाचे ठळक संकेत आहेत.

डिसेंबर 2025 मध्ये उत्तर सौदी अरेबियातील अल-जौफ, तबुक आणि हेल या भागांत गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठी बर्फवृष्टी झाली. नफुदसारख्या वाळवंटातील वाळूचे ढिगारे बर्फाखाली दडलेले द़ृश्य जगासाठी आश्चर्यकारक होते. उत्तरेकडून आलेल्या तीव्र थंड हवेच्या लाटेने आर्द्रतेने भरलेल्या ढगांशी संपर्क साधल्यामुळे हा दुर्मीळ प्रकार घडला आणि तापमान उणे चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले. वाढत्या जागतिक तापमानामुळे वातावरणात ओलावा धरण्याची क्षमता वाढत आहे, त्यामुळे थंड लहरी आल्या की अशा कोरड्या प्रदेशातही तीव्र बर्फवृष्टी किंवा मुसळधार पाऊस पडतो, असे हवामानशास्त्रज्ञ सांगतात.

याच काळात आईसलँडमध्ये याच्या अगदी उलट चित्र दिसले. आर्क्टिकच्या जवळ असलेल्या सौदानेस परिसरात तापमान 22.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांसाठी अभूतपूर्व आहे. या उष्णतेमुळे रस्त्यांवरील डांबर मऊ झाले आणि हिमनद्यांचे वितळणे वेगाने सुरू झाले. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच असे बदल होणे हे जगाच्या भविष्यासाठी गंभीर इशारा मानले जात आहे.

या परस्परविरोधी घटनांचे मूळ जेट स्ट्रीममधील अस्थिरतेत आहे. जेट स्ट्रीम हा पृथ्वीच्या हवामानाचा ‘नियंत्रक पट्टा’ असून त्यातील बदल संपूर्ण जगाच्या हवामानावर परिणाम घडवतात. अलीकडच्या काळात आर्क्टिक प्रदेश जलद गतीने गरम होत असल्यामुळे विषुववृत्त आणि ध्रुवीय भागांतील तापमानाचा फरक कमी झाला आहे. यामुळे जेट स्ट्रीम कमकुवत आणि अधिक अस्थिर होत आहे. परिणामी, जगभरात टोकाचे आणि अनपेक्षित हवामान बदल दिसून येत आहेत. आर्क्टिक प्रदेश इतर भागांच्या तुलनेत दुप्पट वेगाने गरम होत असल्याने विषुववृत्त आणि ध्रुवीय भागांतील तापमानातील फरक कमी झाला आहे. परिणामी, थंड हवा दक्षिण गोलार्धाकडे तर गरम हवा उत्तर गोलार्धाकडे ढकलली जात आहे. यामुळे जागतिक हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत.

या टोकाच्या हवामान बदलाचा परिणाम केवळ माणसांवर नाही, तर संपूर्ण प्राणिजगतावर होत आहे. वाळवंटी भागातील प्राणी थंडीशी जुळवून घेऊ शकत नाहीत, तर आर्क्टिकमधील ध्रुवीय अस्वल, सील आणि पक्ष्यांचे अधिवास हिम वितळण्यामुळे नष्ट होत आहेत. स्थलांतराच्या वेळा बदलत आहेत, अन्नसाखळी विस्कळीत होत आहे आणि अनेक प्रजातींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे हे हवामानातील विरोधाभास केवळ निसर्गाचे चमत्कार नसून, मानवाने वेळीच गांभीर्याने घेण्यासाठी निसर्गानेच दिलेले गंभीर इशारे आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news