

शरयू माने
आज उत्तरायणाला आरंभ होत आहे. दक्षिणायण आणि उत्तरायण या खगोलशास्त्रीय घटना आहेत; मात्र आपण भारतीयांनी या आयणांना धार्मिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोडलेले आहेत. अर्थात, या धार्मिक आणि सांस्कृतिक घटनांना असलेलं महत्त्व खगोलशास्त्रीय सत्याशी संबंधितच आहे. आयणांच्या परिवर्तनाच्या काळात वातावरणात जे काही घडतं, त्याच्याशी सुसंगत अशाच आपल्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित होतं, ते यामुळंच...
उत्तरायण म्हणजे शास्त्रीयद़ृष्ट्या सूर्याची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाटचाल. उत्तरायण 21 डिसेंबरच्या दिवशी चालू होते. या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते. तसं पाहिलं तर मकर संक्रांतीपासून उत्तरायण चालू होते. भारतामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते ती याच कारणामुळे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्याने याला मकर संक्रांत असे नाव दिलेले आहे. हा हिंदू सण सांस्कृतिक रितीने साजरा केला जातो. खगोलीय हालचाल हे शास्त्रशुद्ध कारण आहे. खरं तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते; पण सांस्कृतिक पद्धतीनुसार सूर्याचं भ्रमण मानलं गेलेलं आहे. 21 डिसेंबर रोजी सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो आणि मकर संक्रांतीला तो उत्तर गोलार्ध पार करत पुढे सरकलेला असतो. उत्तरायण आणि दक्षिणायण या दोन स्थितींमध्ये पूर्ण वर्षाचं विभाजन होते. एक वर्षात पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण होते. उत्तरायण हे 21 डिसेंबर ते 21 जूनपर्यंत चालू असते. दक्षिणायन 21 जूनला चालू होऊन 21 डिसेंबरला संपते. 22 डिसेंबरला खर्याअर्थाने सूर्याचे उत्तरायण चालू होते. म्हणून 22 डिसेंबर हा सर्वात छोटा दिवस असतो. त्या दिवसानंतरची रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून जास्तीत जास्त दक्षिणेकडे कललेला दिसतो. उत्तरायण हे दक्षिणायणच्या अगदी विरुद्ध असते. यात सूर्याचे भ्रमण दक्षिण गोलार्धाच्या दिशेने होत राहते.
उत्तरायण हे धार्मिक द़ृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. हा काळ लोक आनंदाने साजरा करतात. मकर संक्रांत या उत्सवाला भारतामध्ये सांस्कृतिक महत्त्व आहे. ठिकठिकाणी या सणाला वेगळे नाव आणि रूप प्राप्त झालेले आहे. पोंगल, लोहरी या नावानेही ते साजरे होतात. पतंग उडवले जातात. पतंग उडवण्याची प्रथा ही सांस्कृतिक असली, तरी त्याला शास्त्रीय कारण आहे. पतंग उडविण्याच्या निमित्ताने सूर्याची किरणे आपण घेतो. उन्हामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो. या निमित्ताने ही उन्हं रोगराई, त्वचेचे आजार कमी करतात. तीळ आणि गुळापासून पदार्थ बनवले जातात. हे शरीरातील थंडी कमी करतात. सहा महिन्यांचा हा उत्तरायणाचा कालावधी हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे सरकणारा असतो. उत्तरायणाच्या दरम्यान सूर्य पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ येत राहतो, म्हणून उन्हाळ्यात पृथ्वीवरचे तापमान वाढत राहते. भगवद्गीतेत सांगितल्यानुसार उत्तरायणाच्या काळाला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. श्रीकृष्णाने याचा महिमा स्वतः वर्णन केलेला आहे.
महाभारताचे युद्ध उत्तरायणात चालू झाले होते. हा काळ गंगापुत्र भीष्म यांनी बाणांच्या शय्येवर पडून दक्षिणायणाची वाट पाहण्यात घालवला. त्यांना उत्तरायणामध्ये प्राणत्याग करायचा नव्हता. उत्तरायणाला प्रकाशाचा काळही संबोधले जाते. आयण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून याचा अर्थ भ्रमण असाच आहे. हे ऋतू बदलतानाचे सूचक असतात. दक्षिणायणापेक्षा उत्तरायण या खगोलीय हालचालीला भारतीय पंचागात विशेष महत्त्व आहे. आयण(न) दिन म्हणजे वर्षातील दान दिवस किंवा दान क्षण. ते क्षण म्हणजे 21 जून व 22 डिसेंबर आहेत. हे आयण सूर्याच्या राशी स्थिती बदलाचे प्रतीक आहेत. हे हळूहळू होत असल्याने 71 ते 72 या वर्षांपर्यंत मकर संक्रांत ही 13 ते 14 तारखेच्या दरम्यान असायची. ती काही वर्षांपासून 14 अगर 15 जानेवारीला येते. काही वर्षांनी मकर संक्रांत ही 15 व 16 जानेवारीला असेल. 1902 मध्ये पहिल्यांदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला होती. 2026 मध्ये मकर संक्रांत उत्तरायणामुळे 14 जानेवारीला बुधवारी असेल. मकर संक्रांत हा सण स्नान आणि दान या गोष्टींना महत्त्व देतो. या दिवसांत केलेले दान हे व्यर्थ जात नाही. संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंक्रांतीचा असतो. त्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. सुवासिनी हळदी-कुंकवाचे दान देतात. एकमेकींना भेटवस्तू देतात. 2026 च्या संक्रांतीला पिवळा रंग शुभ म्हणून ठरवलेला आहे. दक्षिण भारतामध्ये या दिवशी पांढर्या रंगाला प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर नारंगी, लाल, हिरवा या रंगांनाही सांस्कृतिक व आध्यामिक महत्त्व प्राप्त आहे. काही ठिकाणी स्त्रिया काळे वस्त्र परिधान करतात. नकारात्मकतेचा नाश करणे हा यामागचा उद्देश आहे. मकर संक्रांतीदिवशी सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा भारतामध्ये आहे. हा पुण्यकाल आहे.
अशारीतीने सूर्याच्या उत्तरायणामुळे काही धार्मिक गोष्टींना व पूजेलाही महत्त्व आहे. सकारात्मक गोष्टींची देवाण-घेवाण व्हावी, यासाठी एकमेकांना आपण संक्रांती दिवशी तिळगूळ देतो आणि ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हे आवर्जून बोलतो. यामुळे नावांमध्ये गोडवाही निर्माण होतो आणि दुरावा नष्ट होतो. पारंपरिक बाबींना बाजूला ठेवून विचार केला, तर आयण हे निमित्तमात्र नाही, ते दर सहा महिन्यांनी घडतच असतं. आपण मात्र ठरावीक घटनांचे निमित्त साधून त्या त्या गोष्टी परंपरेच्या अंतर्गत करत असतो. या गोष्टींना भावनांचे बंध असतात.
आपल्या प्रथा-परंपरा काहीही असोत, तथापि, खगोलीय घटना मात्र ठरलेल्या आयणानुसार घडतात. त्यांना ना भावना ना बंध; पण एकाच रीतीने एकाच रेषेत फिरणारे हे पृथ्वीचे स्वतःभोवतीचे अगर सूर्याचे भ्रमण म्हटले, तरी यानुसारच माणसांचे जीवितकार्य सुनिश्चित होत राहते. प्रत्येक गोष्टीला परंपरेमध्ये गुंफणं आणि भावनात्मक जोड देणं हे फक्त मानवजातीलाच करणं शक्य आहे. या भ्रमणानुसार पंचांगे अस्तित्वात आली आणि त्यातील बाबींची सुनिश्चितता आली. आपलं जीवन, दैनंदिन गोष्टी ओघाने यानुसार बांधल्या गेल्या. आपल्या सवयी निश्चित झाल्या. काय करावं, काय करू नये, यासाठी पंचांगे, दिनदर्शिका अस्तित्वात आल्या. आपलं धावपळीचं जीवन या आयणाप्रमाणेच आहे. दिवसभर परिश्रमानंतर थकून विसावण्यासाठी पुन्हा रात्र होते, या आयणाला घडविण्यासाठी! मकर संक्रांत हा नुसता सण नसून तो उत्तरायणाचा एक भाग आहे. 2026 चे उत्तरायण हे खगोलशास्त्रीयद़ृष्ट्या महत्त्वाचे ठरणारे आहे.