Talc Powder Cancer Case: अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपनीच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कॅलिफोर्नियातील एका ज्युरीने टॅल्क-आधारित बेबी पावडरच्या वापरामुळे दोन महिलांना ओव्हेरियन कर्करोग झाल्याचा ठपका ठेवत कंपनीला 40 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच सुमारे 362 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
लॉस एंजेलिस सुपीरियर कोर्टाच्या ज्युरीने मोनिका केंट यांना 1.8 कोटी डॉलर्स, तर डेबोरा शुल्ट्ज आणि त्यांच्या पतीला 2.2 कोटी डॉलर्स देण्याचा आदेश कंपनीला दिला आहे. ज्युरीच्या मते, टॅल्क उत्पादनांशी संबंधित धोक्याबाबत कंपनीला अनेक वर्षांपासून माहिती होती, मात्र ग्राहकांना कोणतीही स्पष्ट सूचना किंवा इशारा देण्यात आला नव्हता.
मोनिका केंट यांना 2014 मध्ये ओव्हेरियन कर्करोगाचे निदान झाले, तर डेबोरा शुल्ट्ज यांना 2018 मध्ये हा आजार असल्याचे समोर आले. दोन्ही महिलांनी न्यायालयात सांगितले की, त्या सुमारे 40 वर्षे स्नानानंतर नियमितपणे जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर वापरत होत्या. उपचारादरम्यान त्यांना मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि केमोथेरपी सहन करावी लागली, असेही त्यांनी सांगितले.
फिर्यादींच्या वतीने वकील अँडी बर्कफिल्ड यांनी युक्तिवाद केला की, कंपनीला टॅल्क पावडरच्या संभाव्य धोक्यांची माहिती होती, मात्र ती माहिती लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्युरीने हा युक्तिवाद मान्य करत नुकसान भरपाईचा निर्णय दिला.
मात्र कंपनीच्या वतीने वकील अॅलिसन ब्राउन यांनी सांगितले की, या प्रकरणात ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. कंपनीचा दावा आहे की, अमेरिकेतील कोणत्याही मोठ्या आरोग्य संस्थेने टॅल्क आणि ओव्हेरियन कर्करोग यांच्यात थेट संबंध असल्याचे अधिकृतपणे मान्य केलेले नाही.
जॉन्सन अँड जॉन्सनचे लिटिगेशन अधिकारी एरिक हास यांनी निवेदनात सांगितले की, कंपनी या निर्णयाविरोधात तात्काळ अपील करणार आहे. याआधीही अशा अनेक प्रकरणांत कंपनीला यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला. कंपनीचे म्हणणे आहे की, तिची उत्पादने सुरक्षित आहेत.
सध्या जॉन्सन अँड जॉन्सनवर 67,000 पेक्षा अधिक टॅल्क-संबंधित खटले प्रलंबित आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ओव्हेरियन कर्करोगाशी संबंधित असून, काही प्रकरणे मेसोथेलियोमासारख्या गंभीर कर्करोगाशी संबंधित आहेत.
कंपनीने 2020 मध्ये अमेरिकेत टॅल्क-आधारित बेबी पावडरची विक्री बंद केली होती आणि त्याऐवजी कॉर्नस्टार्च-आधारित उत्पादन बाजारात आणले होते. अलीकडेच कोर्टाने कंपनीची दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे सेटलमेंट करण्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे येत्या काळात जॉन्सन अँड जॉन्सनसमोर आणखी मोठ्या कायदेशीर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.