European Union fines Google : डिजिटल बाजारातील मक्तेदारीविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी युरोपियन युनियनने (EU) आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'गूगल'ला ८९० दशलक्ष युरो (सुमारे १ अब्ज डॉलर) चा दणका दिला आहे. आज (दि. २३) या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. अमेरिकी प्रशासनाचा विरोध आणि आयात शुल्काच्या (टॅरिफ) धमक्यांना न जुमानता, टेक जगतातील दिग्गजांकडून इतर स्पर्धक कंपन्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी युरोप कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
युरोपियन युनियनच्या हवाल्याने 'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, गूगलने आपल्या 'गूगल प्ले स्टोअर' आणि सर्वव्यापी 'सर्च इंजिन'च्या वर्चस्वाचा गैरवापर केला. कंपनीने इतर स्पर्धक कंपन्यांचे नुकसान करत ग्राहकांना केवळ स्वतःच्याच सेवा आणि ॲप्स वापरण्यास भाग पाडले. ही कृती डिजिटल जगतातील निकोप स्पर्धेच्या आणि ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
पहिला दंड (४६० दशलक्ष युरो): 'डिजिटल मार्केट्स ॲक्ट' (DMA) अंतर्गत गूगल सर्च रिझल्टमध्ये शॉपिंग, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट आणि स्पोर्ट्स रिझल्ट दाखवताना स्वतःच्याच सेवांना प्राधान्य दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला.
दुसरा दंड (४३० दशलक्ष युरो): 'गूगल प्ले स्टोअर'वर नियम लादून ॲप डेव्हलपर्सना इतर स्पर्धक स्टोअर्स किंवा वेबसाईटवरील स्वस्त ऑफर्स ग्राहकांपर्यंत मोफत पोहोचवण्यापासून रोखल्याबद्दल हा दंड करण्यात आला आहे.
नव्या नियमावलीनुसार (DMA) गूगलवर झालेली ही पहिलीच, तर स्पर्धाविरोधी धोरणांमुळे गेल्या दोन दशकांत झालेली ही पाचवी व सहावी मोठी कारवाई आहे. आतापर्यंत गूगलला युरोपमध्ये एकूण १०.३८ अब्ज युरोचा दंड झाला आहे.
"कायद्यांचे पूर्ण पालन केले जाईल हे पाहणे हे आमचे कर्तव्य आहे," असे युरोपियन युनियनच्या अँटीट्रस्ट प्रमुख तेरेसा रिबेरा यांनी स्पष्ट केले आहे. तर "डिजिटल बाजारात सर्वांना समान संधी आणि निकोप स्पर्धा राहावी यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे," अशी माहिती तंत्रज्ञान प्रमुख हेन्ना विर्कुनेन यांनी दिली.
स्पर्धकांना समान संधी देणे आणि ॲप डेव्हलपर्सना मोकळीक देण्यासाठी युरोपियन आयोगाने गूगलला ६० दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, गूगलने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागण्याचे संकेत दिले आहेत. "नियमांचे पालन करण्यासाठी युरोपातील युझर्सना आवडणारी सर्व्हिस उदा. हॉटेल्स व फ्लाईट्सचे रिअल-टाईम दर आणि थेट बुकिंग—आम्हाला बंद करावी लागत आहे. शिवाय 'गूगल प्ले'ची सुरक्षा यंत्रणाही हटवावी लागत आहे. ही निकोप स्पर्धा नसून स्वार्थी तक्रारदारांमुळे उत्पादनाचा दर्जा घसरवण्याचा प्रकार आहे. नियमांमुळे उत्पादने सुधारायला हवीत, खराब व्हायला नकोत," असे गूगलचे जागतिक व्यवहार अध्यक्ष केन्ट वॉकर यांनी म्हटले आहे.
युरोपियन आयोगाने स्पष्ट केले की, नियमांचे पालन करण्यासाठी गूगलसोबत "सकारात्मक चर्चा" सुरू असून कंपनीने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. गूगलने सर्च इंजिनवर स्वतःच्या शॉपिंग, हॉटेल्स आणि फ्लाईट सेवा दर्शवण्याच्या पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मिळणाऱ्या माहितीबाबतही या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. गूगलच्या या सकारात्मक पावलांचे आयोगाने स्वागत केले आहे.
दरम्यान, अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने यापूर्वी युरोपवर दंडात्मक कर लादण्याची धमकी दिली दिली होती. युरोपियन युनियनने या नियमावलीअंतर्गत (DMA) यापूर्वी 'ॲपल' (Apple) आणि 'मेटा' (Meta) वरही मोठी कारवाई केली आहे.
सिलिकॉन व्हॅलीपासून ते बीजिंगपर्यंतच्या महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यात युरोपियन युनियनने (ब्रसेल्स) जगभरात आघाडी घेतली आहे. युरोपियन युनियनची ही कारवाई त्याच धोरणाचा एक भाग मानली जात आहे. गूगलवर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, आपल्या 'अँड्रॉइड' (Android) मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमच्या वर्चस्वाचा गैरवापर करून इतर स्पर्धकांना दडपल्याचा आणि ग्राहकांचे पर्याय मर्यादित केल्याचा आरोप गूगलवर झाला होता. त्याप्रकरणी युरोपियन युनियनने गूगलला तब्बल $४.५ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला होता. या दंडाविरोधात गूगलने केलेले अपील न्यायालयाने अलीकडेच फेटाळून लावले आहे.