Russia North Korea Alliance
प्योंगयांग : रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांना कडक इशारा दिला आहे की त्यांनी उत्तर कोरियाच्या विरोधात कोणतेही सुरक्षा गठबंधन किंवा लष्करी आघाडी निर्माण करू नये. सध्या लावरोव उत्तर कोरियाच्या वॉनसान शहराच्या दौऱ्यावर असून त्यांनी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांची भेट घेतली.
लावरोव यांनी उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्री चोई सोन हुई यांच्याशी देखील सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लावरोव म्हणाले की, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान उत्तर कोरियाच्या भोवती लष्करी तैनाती वाढवत आहेत. हे धोरण धोकादायक असून कोणत्याही देशाच्या विरोधात गठबंधन करण्यासाठी या संबंधांचा वापर होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.
उत्तर कोरिया-रशिया लष्करी सहकार्य वाढवणार
लावरोव यांनी दोन्ही देशांदरम्यान लष्करी सहकार्य अधिक मजबूत करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर संयुक्त कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत रशिया आणि उत्तर कोरियाचे संबंध अधिक घट्ट झाले असून दोन्ही देश जागतिक पातळीवर आपले हितसंबंध जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
लावरोव तीन दिवसांच्या उत्तर कोरिया दौऱ्यावर आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रशियाला उत्तर कोरियाचे आण्विक शस्रास्त्र विकासाचे कारण समजते. त्यांनी म्हटले आहे की, “उत्तर कोरियाचे अणु तंत्रज्ञान ही त्यांच्या वैज्ञानिकांची मेहनत आहे आणि आम्ही त्यांच्या आकांक्षांचा आदर करतो.”
युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग
रशियन वृत्तसंस्था TASS च्या माहितीनुसार, लावरोव आणि उत्तर कोरियन नेत्यांमध्ये युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. उत्तर कोरिया यापूर्वीच रशियाला सैनिक आणि शस्त्रे पुरवून मदत करत आहे. याच्या बदल्यात उत्तर कोरियाला रशियाकडून लष्करी आणि आर्थिक मदत मिळते.
यूक्रेनच्या गुप्तचर संस्थेनुसार, उत्तर कोरिया आणखी 25 ते 30 हजार सैनिक रशियाला पाठवण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी त्याने सुमारे 11 हजार सैनिक पाठवले होते.
मागील वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये एक नवा संरक्षण करार (Defense Deal) केला. या करारानुसार, जर कुठल्याही देशाने रशिया किंवा उत्तर कोरियावर हल्ला केला तर दोन्ही देशांनी एकत्रितपणे त्या विरोधात लढायचे आहे.
किम जोंग उन यांनी या डीलला ‘एलायन्स’ असे नाव दिले असून दक्षिण कोरियाने या कराराला तीव्र विरोध केला आहे.
दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इतर देशांना भीती आहे की रशिया उत्तर कोरियाला अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी अत्यंत संवेदनशील तंत्रज्ञान पुरवू शकतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ही वाढती जवळीक आणि सहकार्य जागतिक स्तरावर नव्या संघर्षांची शक्यता निर्माण करत आहे.