

NASA Astronaut Dinner at ISS
पुढारी ऑनलाईन डेस्क : अन्न हे फक्त शरीराला उर्जा देण्यासाठी नसून, ते माणसांना एकत्र आणण्याचं माध्यमदेखील असतं. हेच वास्तव NASAचे अंतराळवीर जॉनी किम यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अनुभवले.
त्यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे एक अविस्मरणीय अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये अॅक्सिओम-4 मोहिमेतील सहकाऱ्यांसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील जेवणाचा प्रसंग त्यांनी अनुभवला.
“या मोहिमेतील सर्वात अविस्मरणीय संध्याकाळ म्हणजे Ax-4 सह नवीन मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेणं,” असे किम यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अंतराळातील अन्न मर्यादित साधनांमुळे थोडं वेगळं असतं. तरीही अंतराळवीरांनी मात्र जेवणाची चव आणि उत्सवाचा अनुभव यामध्ये कोणतीही तडजोड केली नाही.
स्टार्टर्स
हायड्रेट केलेले श्रिम्प (कोळंबी) कॉकटेल व क्रॅकर्स येथे स्टार्टर म्हणून होते. पृथ्वीवरील समृद्ध गार्निशिंग केले नसले तरी याच्या चवीने घरची आठवण करून दिली.
मुख्य जेवण
चविष्ट चिकन व बीफ फाजिताज हे पदार्थ मुख्य जेवणाचा भाग होते. अंतराळातील सीमित साधनांतून हे जेवण तयार केले होते.
डिझर्ट
जेवणाचा शेवट गोडसर आणि खास पद्धतीने झाला. “स्वीट ब्रेड, कंडेन्स्ड मिल्क आणि अक्रोडांपासून बनवलेला केक” असे डिझर्ट जेवणाच्या शेवटी सर्व करण्यात आले. रशियन कोस्मोनॉट्सनी तयार केलेला हा केक सगळ्यांच्या पसंतीस उतरला.
जॉन किम यांनी सोशल मीडियात शेअर केलेल्या पोस्टमध्ये उपस्थितांची नावे दिलेली नाहीत पण फोटोतून दिसते की यावेळी कोण कोण उपस्थित होते.
यात अॅक्सिओम - 4 मिशनमधील कमांडर पेगी व्हिटसन, पायलट शुभांशु शुक्ला (भारत), मिशन स्पेशालिस्ट स्लावोस्झ युझनान्स्की विस्नेईवस्की (पोलंड), मिशन स्पेशालिस्ट तिबोर कापू (हंगेरी) हे चार सदस्य उपस्थित होते.
तसेच ISS Expedition 73 क्रूचे 7 सदस्यही उपस्थित होते. त्यात जॉनी किम, निकोल आयर्स, सर्जी रिझिकोव्ह, किरिल पेसकोव्ह, ताकुया ओनिशी, अॅने मॅकक्लेन यांचा सहभाग होता. या सर्वांनी मिळून अंतराळातील हा खास जेवणाचा अनुभव साजरा केला.
यापुर्वी जून महिन्यात किम यांनी एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्यांनी 'स्पेस सुशी' बनवण्याचा अनुभव सांगितला होता. एका सहकारी अंतराळवीराला सुशी खाण्याची इच्छा झाल्यावर, संपूर्ण टीमने मिळून onboard साठ्यातून सुशीसारखा पदार्थ तयार केला.
त्यात भात (rice), स्पॅम (डबाबंद मांस), माशाचे तुकडे, गोचुजांग (कोरियन तिखट सॉस), थोडंसं वसाबी (जपानी मसाला ज्यात सुशी बुडवून खातात) हे पदार्थ तयार केले गेले.
अंतराळ स्थानकात जिथे संसाधने मर्यादित असतात आणि जीवन अत्यंत शिस्तबद्ध असतं, तिथे अन्न हे एक सृजनशीलता आणि सहकार्याचं साधन ठरतं. किम यांच्या अनुभवावरून हे स्पष्ट होते की, अंतराळातसुद्धा जेवण माणसांना एकत्र आणू शकतं.
हा प्रसंग केवळ जेवणापुरता मर्यादित नव्हता, तर तो माणुसकीच्या, विविधतेच्या आणि एकतेच्या उत्सवाप्रमाणे होता. विविध देशांतील आणि पार्श्वभूमीतील अंतराळवीरांनी एकत्र येत मानवतेचे प्रतिनिधित्व कसे करावे, याचे हे उत्तम उदाहरण ठरले.