

Russian woman in cave with two daughters jungle Gokarna Karnataka
गोकर्ण : कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथील रम्य परंतु अत्यंत धोकादायक रामतीर्थ डोंगरावर एका रशियन महिलेने तिच्या दोन लहान मुलींना घेऊन मागील दोन आठवडे एकांतवासात काढले होते. स्थानिक पोलिसांनी गस्तीदरम्यान ही महिला आणि तिची मुले एक गुहेत राहत असल्याचे आढळून आले. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
या महिलेचे नाव नीना कुटिना असे असून तीचे वय 40 वर्षे इतके आहे. तिच्या दोन मुलींपैकी एकीचे नाव प्रेमा (वय 6 वर्षे) आणि दुसरीचे अमा (वय 4 वर्षे) आहे. पोलिसांनी 9 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता या तिघांना गुहेतून शोधून काढले आणि सुरक्षितपणे खाली आणले.
नीना कुटिनाने पोलिसांना सांगितले की, ती गोव्यातून गोकर्णला आलेली असून, शहरातील गोंगाट आणि धकाधकीच्या जीवनापासून दूर जाऊन अध्यात्मिक साधना करण्यासाठी तिने या वनक्षेत्रात एकांतवास पत्करला होता. ती ध्यान, प्रार्थना आणि आत्मशांतीसाठी या गुहेत राहत होती.
ही गुहा रामतीर्थ टेकडीवर असून, या परिसरात जुलै 2024 मध्ये मोठे भूस्खलन झाले होता. तसेच हा परिसर विषारी साप, जंगली प्राणी आणि अपघाती धोक्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे राहाणे अत्यंत धोकादायक ठरते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
नीना हिचे व्हिसा आणि पासपोर्ट हरवले असल्याचे तिने सांगितले मात्र गोकर्ण पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त शोध मोहिमेमध्ये हे दस्तऐवज गुहेतून मिळाले. त्यानंतर जेव्हा कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात कळाले की, नीना ही 17 एप्रिल 2017 पर्यंत वैध असलेल्या व्यवसायिक व्हिसावर भारतात आली होती.
तिला 19 एप्रिल 2018 पर्यंत गोवा FRRO कडून एक्झिट परमिट देखील देण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिने नेपाळला प्रवास करून 8 सप्टेंबर 2018 रोजी पुन्हा भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर ती बेकायदेशीररीत्या येथे वास्तव्य करत होती.
महिलेच्या विनंतीनुसार पोलिसांनी तिला उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात बंकीकोडळा गावातील एका आश्रमात हलवले आहे. हा आश्रम 80 वर्षीय स्वामी योगरत्ना सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जातो.
सध्या नीना व तिच्या मुली आश्रमात राहत असून, स्थानिक प्रशासन व सामाजिक कल्याण विभाग यांच्याकडून योग्य समुपदेशन व तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे परदेशी नागरिकांची व्हिसा स्थिती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय प्रशासनाच्या दक्षतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.