Donald Trump 1st May Deadline: अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या सैन्य ठिकाणांवर तुफान हल्ला झाला आहे. दरम्यान, अमेरिकेनं शस्त्रसंधी जाहीर करून चर्चेची दारं उघडली आहेत. मात्र इराणने आपल्या अटी मान्य झाल्या तरच चर्चा अशी भूमिका घेतल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी गोची झाली आहे.
नुकतेच इराणने जोपर्यंत अमेरिका होर्मुझ ब्लॉकेड काढत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे अमेरिका चर्चेसाठी उतावळी झाली असून पडद्यामागून अनेक मोठ्या हलाचाली होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध लवकरात लवकर संपवायचं आहे असं जाणकारांचे मत आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या दृष्टीकोणातून १ मे ही तारीख अत्यंत महत्वाची असल्याचं बोललं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध सुरूच ठेवण्याचा मोठा दबाव आहे. दुसरीकडे १ मे ही तारीख देखील जवळ येत असल्यामुळं ट्रम्प कात्रीत अडकले आहेत.
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार १९७३ चा एक जुना कायदा वॉर पॉवर्स रेजोल्युशन यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आहे. अमेरिकेच्या या कायद्यानुसार राष्ट्रपती संसदेची (अमेरिकन काँग्रेस) मंजूरी न घेता फक्त ६० दिवस आपल्या लष्कराला युद्धात उतरवू शकते.
अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इस्त्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला होता. मात्र याची माहिती २ मार्चला संसदेला देण्यात आली. त्यानुसार काँग्रेसला माहिती न देता युद्धात लष्कर उतरवल्यानंतर ६० दिवसांचा कालावधी हा १ मे रोजी संपुष्टात येतोय.
जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अशा परिस्थितीत फक्त दोन मार्ग आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता युद्धासाठी संसदेची परवानगी घ्यावी लागेल. किंवा त्यांना आपलं सैन्य माघारी बोलवावं लागेल. सध्याच्या घडीला तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीमागे एकसंधपणे उभा आहे. मात्र पक्षातील काही सिनेटर्सचा सूर बदलत आहे. यूटाचे सिनेटर जॉन कर्टिस यांनी ६० दिवसानंतर संसदेच्या परवानगीशिवाय लष्करी कारवाईला त्यांचे समर्थन नसेल.
हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट यांनी देखील १ मे नंतर मतदानाचे समीकरण बदलू शकतं असा इशाला दिला आहे. यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत ट्रम्प हे आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेत होते. आता त्यांच्या या मनमानीला चाप बसण्याची शक्यता आहे.
जर अमेरिकेच्या संसदेने युद्ध पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना संसदेला अशी परवानगी देण्याची अपील करावी लागेल. सध्याच्या घडीला अशी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. जर परवानगी मिळाली नाही तर त्यांना इराणच्या आसपास तैनात केलेल्या आपल्या लष्कराला माघारी बोलावावं लागेल. लष्कराच्या सुरक्षित परतण्यासाठी कायद्यानुसार ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळतो. मात्र या काळात त्यांना हल्ले करता येणार नाहीत.