

Donald Trump Speech: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यामधील युद्ध आता निर्णायक स्थितीत पोहचलं आहे. देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या विधानावरून त्यांची पुढची रणनिती ठरत आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० मिनिटे आपल्या देशाला संबोधित केलं. भाषण जरी अमेरिकेतील जनतेसाठी असले तरी त्याचे पडसाद अख्या जगावर पडणार होते. सर्वांना एकाच प्रश्नाच्या उत्तराची उपेक्षा होती ती म्हणजे हे युद्ध कधी संपणार त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तळ्यात मळ्यातील भूमिका घेतली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच दावा केला की, 'गेल्या चार आठवड्यात आमच्या सैन्याने युद्धात वेगवान, निर्णायक आणि मोठा विजय मिळवला आहे. असा विजय यापूर्वी फार कमी लोकांनी पाहिला असेल. त्यांनी सांगितलं की आम्ही इराणची लष्करी ताकद जवळपास संपुष्टात आणली आहे. आजच्या रात्री इराणची नौसेना संपलेली असेल. त्यांची हवाई दल पूर्णपणे नष्ट झालं आहे. इस्लमामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सची कमांड आणि कंट्रोल सतात्याने नष्ट केली जात आहे.'
ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, इराणची ड्रोन क्षमता आणि मिसाईल ताकद खूप कमकूवत करण्यात आली आहे. युद्धाच्या आतापर्यंतच्या इतिहासात एखाद्या शत्रूची इतक्या कमी आठवड्यात इतकी विनाशकारी हानी कधी झाली नव्हती.'
डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या लष्करी विजयाची शेखी मिरवत असतानाच त्यांच्याच भाषणातून याची दुसरी बाजू देखील समोर आली. ट्रम्प अमेरिकेच्या विजयाचे चित्र दाखवत असतानाच अजून युद्ध संपुष्टात आलेले नाही असं संकेत देखील त्यांनी दिले. ते म्हणाले, येणाऱ्या २ ते ३ आठवड्यात आम्ही इराणला अजून कडक प्रत्युत्तर देणार आहोत. त्यांनी जर गरज पडली तर इराणच्या तेल साठ्यांना देखील निशाणा बनवलं जाईल. त्यांच्या या वक्तव्यानं लष्करी संघर्ष अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कूटनितीचा उल्लेख करत पडद्यामागे चर्चा सुरू आहे. तो रस्ता अजून बंद झालेला नाही. मात्र त्यांच्या वक्तव्यावरून ते लवकर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहेत असं दिसतं. अमेरिका आपलं ऑपरेशन एपिक फ्युरी अर्धवट सोडू इच्छित नाही असं दिसतंय.
स्ट्रेट ऑफ हार्मुझबाबत देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, 'अमेरिकेला स्ट्रेट ऑफ हार्मुझची गरज नाही. ट्रम्प यांनी सहकारी देशांना गद्दार म्हणत लष्करी संघर्ष संपल्यावर आपोआप स्ट्रेट ऑफ हार्मुझ खुला हाईल असं वक्तव्य केलं. त्यांनी इराण दबावात असून त्यांनी सीज फायरची मागणी केली आहे असा देखील दावा केला.
युद्धाच्या मैदानातील घडामोडी या दाव्याशी सुसंगत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील वक्तव्ये त्यांची रणनिती स्पष्ट करतात ते एका बाजूला दबाव टाकत आहेत आणि दुसऱ्या बाजूला चर्चा करत आहेत. ट्रम्प यांनी अमेरिका आपल्या लष्करी उद्दीष्टांच्या अत्यंत जवळ पोहचला आहा आम्ही आमच्या मोहीमेच्या अंतिम टप्प्यात आहोत. असं सांगत इराणला कधीही अणुबॉम्ब तयार करू देणार नाही असं सांगितलं.
असं असलं तरी त्यांनी आपल्या भाषणात अनेक युद्धे ही दीर्घकाळ चालतात असं वक्तव्य केलं. त्यामुळं हा लष्करी संघर्ष अजून किती काळ चालणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला विजयाचा दावा करत आहेत तर दुसऱ्या बाजूला युद्ध सुरूच राहणार असल्याचे संकेत देत आहेत. त्यांच्या या तळ्यात मळ्यातील वक्तव्यांमुळे संपूर्ण जग संभ्रमात आहे.