Donald Trump Iran threat  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Donald Trump : "कोणीच शिल्लक राहणार नाही..." : इराणला इशारा देताना राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

इराणचे लोक खामेनींचा "तिरस्कार" करत असतील असे आपल्याला वाटले होते

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump Iran threat : इराणच्या उर्वरित नेतृत्वाला आपण अवघ्या एका झटक्यात संपवू शकतो, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, तसे केल्यास चर्चा करण्यासाठी तिथे "कोणीच शिल्लक राहणार नाही", त्यामुळे आपण असे करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ते करारासाठी आमच्याकडे गयावया करत आहेत

"खामेनींच्या अंत्यसंस्काराला सगळे तिथे एकत्र जमले आहेत. एका झटक्यात आपण त्या सर्वांना संपवू शकतो, पण आम्ही तसे करणार नाही कारण त्यानंतर आमच्याशी चर्चा करायला तिथे कोणीच उरणार नाही... ते करार करण्यासाठी आमच्याकडे गयावया करत आहेत," असे ट्रम्प यांनी 'एक्सिओस' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

दोन्ही बाजूंनी चर्चेतून एक आठवड्याचा ब्रेक

खामेनी यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित कार्यक्रम संपेपर्यंत दोन्ही बाजूंनी चर्चेतून एक आठवड्याचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दोन्ही पैकी कोणतीही बाजू एकमेकांवर हल्ला करणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.

अंत्यसंस्काराच्या वेळेबाबत मार्च महिन्यापासून तर्कवितर्क

इराणवर ३६ वर्षे राज्य करणारे अली खामेनी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी मारले गेले होते. याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले सुरू केले होते. मध्य पूर्वेतील युद्धाला तोंड फुटले. खामेनींच्या अंत्यसंस्काराच्या वेळेबाबत मार्च महिन्यापासून तर्कवितर्क लावले जात होते. इस्लामिक कायद्यानुसार मृत्यूनंतर मृतदेह लवकरात लवकर, शक्यतो २४ तासांच्या आत दफन करणे आवश्यक असते. परंतु युद्धाच्या परिस्थितीमुळे या नियमाला अपवाद करण्यात आला.

अमेरिकेच्या स्थापनेचा दिवस निवडला अंत्यसंस्काराचा दिवस

इराणने खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराची सुरुवात करण्यासाठी ४ जुलै हा दिवस निवडला. हा दिवस अमेरिकेच्या स्थापनेचा वर्धापन दिन आहे. या अंत्यसंस्कार विधींमध्ये ७ जुलै रोजी तेहरानच्या दक्षिणेकडील पवित्र शहर 'कोम' मधील कार्यक्रमांचा आणि इतर धार्मिक विधींचा समावेश असेल. ९ जुलै रोजी उत्तर-पूर्वीय पवित्र शहर आणि खामेनेईंचे मूळ गाव असलेल्या 'मशहाद' येथे त्यांच्या दफनविधीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

अंत्यसंस्कार सोहळ्यास खामेनी यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी

लाखो इराणी नागरिक रस्त्यावर एकत्र येत असल्याने हा अंत्यसंस्कार सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. शनिवार, ४ जुलै रोजी इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे इराणच्या माजी सर्वोच्च नेत्याला निरोप देण्याच्या कार्यक्रमादरम्यान रडताना दिसले.

कदाचित ते खोटे अश्रू असू शकतात

यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी अंत्यसंस्कारात इराणी लोकांना रडताना पाहून आश्चर्य व्यक्त केले. लोक खामेनींचा "तिरस्कार" करत असतील असे आपल्याला वाटले होते, असे ते म्हणाले. "कदाचित ते खोटे अश्रू असू शकतात," असा टोला ट्रम्प यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT